June 13, 2024

मरोळकरांनी केला योगाभ्यास

अंधेरी- आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शाखा क्र. ७५ आणि फिगर फॅक्टरी जीम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २५ जून रोजी सकाळी मरोळ येथील प्राईम ऍकॅडमी स्कूल येथे योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या योगसाधना कार्यक्रमात १३ ते ६७ वयोगटातील एकूण ५८ महिला-पुरुष सहभागी झाले होते. योगसाधनाची सुरुवात वॉर्मअपने झाली. स्ट्रेचिंग, बॉडी फ्री स्टाईल आदी व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. हे व्यायाम प्रकार दैनंदिन जीवनात खूप उपयोगी आहेत. त्यानंतर वेलनेस कोच कामिनी डिसुझा यांनी शरीर संतुलन करणारे व्यायाम प्रकार शिकवले. तसेच श्वासोच्छवासाचे व्यायाम प्रकार देखील यावेळी शिकवण्यात आले. ताडासन, त्रिकोणासनासह इतर योगप्रकार देखील सहभागी योगाभ्यासकांना शिकवण्यात आले.

त्याचप्रमाणे हे योगप्रकार आपल्या आरोग्यास किती महत्वाचे आहेत हे योगप्रशिक्षक डिसुझा यांनी समजावले. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहार कोणता घ्यावा, तो काय असतो, कसा घ्यावा, दिवसभर हा आहार किती प्रमाणात सेवन करावा, मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तींना आहार आणि योगाभ्यास यांचे संतुलन कसे साधावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप प्राणायाम या योगप्रकाराने करण्यात आला. शरीरातील सर्व अवयव जागृत ठेवण्यासाठी ओम चा जप कसा करावा याचे देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

मरोळकरांचे आरोग्य उत्तम राहो या उद्देशाने जागतिक योगदिनाचे औचित्य साधून योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मरोळकरांनी भरभरून प्रतिसाद दिला यासाठी मरोळकरांचे आभार. भविष्यात देखील असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत राहू, अशा शब्दांत युवासेना उपविभाग अधिकारी व आयोजिका अक्षदा सावंत-कदम यांनी आभार व्यक्त केले.