May 25, 2024

मधुराज रेसिपीचा प्रवास – मधुरा बाचल यांची खास मुलाखत

MadhurasRecipe

राणीला चांगल्या घरचं स्थळ चालून आलं. मुला-मुलीची पसंती देखील झाली. होणाऱ्या सासुने राणीला प्रश्न केला. “जेवण येतं ना बनवायला…?” या प्रश्नाने गोंधळलेल्या राणीच्या मदतीला तिची मम्मी धावून आली. “आमच्या राणीला तसं बेसिक जेवण येतं फक्त भाकरी येत नाही. आणि आपल्या सारख्या सुगरणीच्या हाताखाली ती शिकेलच.” सुगरण म्हटल्यावर सासुच्या अंगावर मूठभर मांस चढलं. तिने पुढे काही विचारलं नाही. राणीने सुटकेचा सुस्कारा सोडला. खरंतर राणीच्या मम्मीने चातुर्याने वेळ मारुन नेली. तिने राणीला एका महिन्याचा अवधी दिला स्वयंपाक शिकण्यासाठी. एचआर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारी राणी वेळेचं नियोजन करुन स्वयंपाकघरात शिरुन तो किचकट स्वयंपाक कधी बनणार या विचारानेच त्रस्त झाली. खरं तर आजच्या प्रत्येक तरुणीची ही कहानी आहे. या तरुणींच्या मदतीला एक तरुणी तत्पर असते. ते सुद्धा एका क्लिकवर. स्वयंपाक बनवणं एवढं सोप्पं असतं हे तिच्यामुळे जाणवलं. प्रसूतीरजेच्या दरम्यान रेसिपी शोधताना तिनेच नव्या कलाकृतीला जन्म दिला जी काही कोटी लोकांनी पाहिली. ही कलाकृती म्हणजे मधुराज रेसिपी. ही गोष्ट आहे मधुरा मंगेश बाचल यांची.

२००६ मध्ये पुण्याच्या मधुराचं लग्न इंजिनीअर असलेल्या मंगेश बाचल सोबत झाले आणि ती शिकागोला स्थायिक झाली. अमेरिकेत एका बॅंकेत तिला नोकरी मिळाली. कालांतराने तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तो काळ इंटरनेटच्या बाल्यावस्थेचा काळ होता. प्रसूती रजेच्या दरम्यान काही मराठी पदार्थ बनवावेत या हेतूने तिने ऑनलाईन रेसिपी शोधण्यास सुरुवात केली. काही रेसिपी सापडल्या पण त्या खूपच गुंतागुंतीच्या होत्या. तर काही ऑथेन्टीक नव्हत्या. आपल्यासारखे असे कितीतरी खवय्ये मराठी पदार्थ बनवू पाहत असतील पण त्यांना माहिती मिळत नसेल तर ते दुसऱ्या पदार्थांकडे वळत असतील… नाही, आपण आपले मराठी पदार्थ बनवायचे आणि जगभर पोहोचवायचे. मधुराने निश्चय केला. मधुराला तशी स्वयंपाकाची आवड होतीच. तिची आजी सुगरण होती. आजीचे गुण मधुरा जोपासत होती. तिने खाद्यपदार्थांचा ब्लॉग सुरु केला. आणि इथेच जन्म झाला मधुराज रेसिपीचा. तिची पहिली रेसिपी होती ‘भरलं वांगं.’ तो फेसबुकचा सुरुवातीचा काळ होता. मधुराने आपल्या रेसिपी फेसबुकवर पोस्ट केल्या. त्याला मित्रपरिवारात चांगला प्रतिसाद मिळाला.

युट्यूबवर मराठी पदार्थ तयार करुन त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याचा मधुराने विचार केला. घरात डिजीटल कॅमेरा होताच. घरातला लाईट आणि नैसर्गिक प्रकाश सोबतीला होता. माईक नसल्याने मोठ्या आवाजात तिने निवेदन करायचे ठरवले. मराठी माध्यमात शिकल्याने इंग्रजी भाषा बोलण्यात तेवढा सफाईदारपणा नव्हता. आणि त्याकाळी आजच्यासारखा सोशल मीडिया विविध भाषेत नव्हता. मधुराने चिकाटी सोडली नाही आणि जमेल अशा इंग्रजी भाषेत पहिल्या रेसिपीचा व्हिडीओ बनवला. हा पहिला व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला. कोणाला माहित होतं की हे चॅनेल खाद्य संस्कृतीमध्ये मैलाचा दगड ठरेल. हे चॅनेल होते ‘मधुराज रेसिपी’.

वेगवेगळ्या मराठमोळ्या रेसिपीज करणे आणि त्या संपूर्ण जगापर्यंत पोहचवणे हा मधुराचा प्रामुख्याने उद्देश होता आणि त्यातूनच २००९ मध्ये मधुराज रेसिपीजची सुरवात झाली. अशा प्रकारे युट्युब वर मराठी खाद्यवाहिनी सुरु करणारी मधुरा ही पहिली मराठी मुलगी आहे.

युट्युब वर ६८ लाखाहून अधिक लोकांनी पसंत केलेल्या मधुराज रेसिपी चॅनेलला आज १२ वर्ष झाली. युट्युब बरोबरच इतर सोशल मीडिया मिळून १ करोडहून अधिक चाहते मधुराच्या रेसिपीजची वाट पाहत असतात. मधुराज रेसिपी हे एकमेव पहिले मराठी चॅनेल आहे कि ज्याने ७ मिलियन म्हणजे 70 लाखांचा टप्पा कमी कालावधीत पार केलेला आहे. ३५०० हून अधिक रेसिपीज मधुराने आत्तापर्यंत आपल्या चॅनेल आणि वेबसाईट द्वारे जगभरात पोहोचवल्या आहेत.

मधुराने आत्तापर्यंत ६ पाककला पुस्तके लिहिली आहेत आणि ही सारी पुस्तके प्रकाशित केल्यानंतर सतत अमेझॉन बेस्ट सेलरच्या यादीत आहेत. इतकेच नाही तर मधुराज् रेसिपीचे अस्सल मराठमोळे मसालेही बाजारात उपलब्ध झाले आहेत ज्याला सर्वत्र प्रचंड मागणी आहे. मधुरा ही भारतातील पहिली युट्यूबर आहे की जिने स्वतःचे उत्पादन बाजारपेठेत आणून यशस्वी करून दाखविले आहे.

मधुराला आत्तापर्यंत बरेच मान सन्मान प्राप्त झाले आहेत. यामध्ये गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड २०२३, मॅजेस्टी क्विन अवॉर्ड्स २०२३, सन्मान महाराष्ट्राचा 2023, लोकशाही सर्वोच सोशल मीडिया अवॉर्ड २०२२, नवदुर्गा पुरस्कार २०२२, शक्ती अवॉर्ड्स २०२२, यशस्वी नवदुर्गा पुरस्कार २०२१, गौआदिशक्तीचा २०२० अवॉर्ड, आशिया स्तरावरचा व्हिडीओ कन्टेण्ट ऑफ दी इयर 2019, यशस्वी उद्योजक अवॉर्ड २०१९ आदींचा समावेश आहे.

याचसोबत विविध वृत्तपत्रे, मासिक, नियतकालिक यामध्ये मधुराच्या पाककृती प्रसिद्ध होत असतात. मधुराच्या या प्रवासात तिचे पती मंगेश यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशिवाय हा प्रवास अशक्य होता असे त्या सांगतात.

मधुरा आज एक यशस्वी उद्योजिका, नंबर १ युट्युबर, कुशल गृहिणी असून आपल्या या कामातून लाखो महिलांना प्रोत्साहन देत आहेत. सुरुवातीला उल्लेख केलेल्या राणी सारख्या असंख्य तरुणींसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत. पाककला विशेषत: मराठी खाद्यसंस्कृती जगभर पोहोचविणाऱ्या त्या अस्सल लेडी बॉस आहेत.

मुलाखतकार – अर्चना सोंडे