February 21, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांचा दावा

अंधेरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंधेरीतील माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हातात भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.

त्यांच्यासोबत शिवसेना शाखा क्रमांक 83 चे शाखाप्रमुख नरेश सावंत, महाराष्ट्र नाथयोगी सेवा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष भावेश राजपूत, शाखा क्रमांक 82 चे उपशाखाप्रमुख राजाराम यादव, शिव वाहतूक सेनेचे सचिव कल्पेश बालघरे आणि शिव वाहतूक सेनेचे उत्तर मुंबई लोकसभा संघटक मुस्तकिम शेख यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करताना मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकार जोमाने काम करत असून हे शहर एक आतंरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. समाजातील शोषित वंचित घटकासाठी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे यावेळी बोलताना सांगितले. मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असून आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असे मत यावेळी बोलताना मुख्यंत्र्यांनी व्यक्त केले.

“शिवसेनेत आपण गेली ४०-४५ वर्षे कार्यरत आहोत. कामे करत असताना विकासाची कामे व्हावीत हाच आमचा ध्यास होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या कामामुळे प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत. साहेब जो आदेश देतील त्याचे पालन करून आपण तना-मनाचे शिवसैनिक आहोत हे सिद्ध करू,” असे सुभाष कांता सावंत यांनी सांगितले.

सुभाष कांता सावंत हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेना उबाठा पक्षाचे ते विलेपार्ले विभाग संघटक होते. त्यांच्या पक्ष प्रवेशाने अंधेरीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा आहे.