चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्टला उतरले आणि भारत अशी कामगिरी करणारा पहिला देश ठरला. आपल्या भारतात कोणतीही भाषा असो चंद्राला `मामा’ ही उपाधी दिली आहे. पृथ्वी आपली माता आणि चंद्र तिचा भाऊ म्हणून मामा. कित्येक पिढ्या कित्येक गोष्टी, गाणी याच्या माध्यमातून चांदोमामाच म्हणत आली आहे. या चांदोमामावर जेव्हा चांद्रयान उतरलं तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने दाटून आला. चंद्राला जणू काही कविताच घेतलं अशीच प्रत्येकाची भावना होती. हे शक्य झालं ते आपल्या भारताच्या इसरो या अंतराळ संस्थेच्या शास्त्रज्ञांमुळे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं आपण ऐकलं होतं पण या चांद्रयान मोहिमेमागे भारतीय महिला होत्या हे साऱ्या जगाने पाहिले. अंतराळ संशोधन क्षेत्रातील हे आहे महिला संशोधकांचे अष्टक.
- डॉ. के. कल्पना – उप प्रकल्प संचालक
चांद्रयानाने चांद्रभूमीला स्पर्श करताच इस्रोसह संपूर्ण भारतात एकच जल्लोष झाला. इसरोच्या टीमने देशाला संबोधित केले. त्यावेळी व्यासपीठावर उभ्या असलेल्या चार पुरुषांसोबत एक महिला होती.

तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते. डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर कल्पना के म्हणून तिची ओळख झाली. संपूर्ण मिशनच्या यशाचे श्रेय कल्पनाने तिच्या टीमला आणि त्यांच्या प्रयत्नांना दिले.
लँडिंगनंतर बोलताना त्या म्हणाल्या, “हा आपल्या सर्वांसाठी आणि चांद्रयान-3 मधील आमच्या टीमसाठी सर्वात संस्मरणीय आणि आनंदाचा क्षण राहील. चांद्रयान-2 च्या अनुभवानंतर आम्ही आमच्या अंतराळयानाची पुनर्बांधणी सुरू केली त्या दिवसापासून आम्ही आमचे ध्येय साध्य केले आहे. पुनर्रचनेपासून सुरुवात करून आणि आम्ही काळजीपूर्वक आयोजित केलेले सर्व संयोजन, हे केवळ टीमच्या प्रचंड प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.”
कल्पना, मूळच्या बेंगळुरूच्या असून, त्या आयआयटी खरगपूरच्या पदवीधर आहेत. 2003 मध्ये त्या इस्रोमध्ये सामील झाल्या. विविध प्रकल्पांमध्ये त्या सहभागी आहेत. चांद्रयान-3 साठी लँडर सिस्टीम डिझाइन आणि ऑप्टिमाइझ करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्या चांद्रयान-2 मोहिमेचा आणि मंगळ मोहिमेसाठी मंगळयान टीमचा देखील एक भाग होत्या.
- डॉ. रितू करिधल
‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखल्या जाणार्या, डॉ. करिधल 1997 पासून इस्रोमध्ये अंतराळ अभियंता आहेत. त्या भारतीय अंतराळ इतिहासातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.

त्यांनी यानाची पुढील स्वायत्तता प्रणाली विकसित केली ज्यामुळे मंगळयान यशस्वी मोहीम बनली. त्या इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांपैकी एक आहेत आणि अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांच्या प्रमुख सदस्या आहेत. त्या अनेक मोहिमांसाठी ऑपरेशन डायरेक्टर आहे. प्रकल्पाच्या उपसंचालक म्हणून त्यांनी मंगळ मोहिमेचे नेतृत्व केले होते.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान अणुशास्त्रज्ञ दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना 2007 मध्ये ‘इस्रो यंग सायंटिस्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.
- वनिता मुथय्या
वनिता मुथय्या या चांद्रयान-2 च्या प्रकल्प संचालक होत्या, दुसऱ्या चंद्र शोध मोहिमेला लँडिंगच्या प्रयत्नात अपघात झाला होता.

मुथय्या इस्रो मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्या आणि इस्रो मधील पहिल्या महिला प्रकल्प संचालक बनल्या. कार्टोसॅट-1, ओशनसॅट-2 आणि मेगा-ट्रॉपिकसह अनेक उपग्रहांसाठी त्या उपप्रकल्प संचालक होत्या. मंगळयानाचे नेतृत्व करणाऱ्या टीमचा त्या एक भाग होत्या. 2006 मध्ये, त्यांना अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचा ‘सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक’ पुरस्कार मिळाला.
- नंदिनी हरिनाथ
रॉकेट शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांनी 14 हून अधिक अंतराळ मोहिमांमध्ये काम केले आहे आणि गेल्या 20 वर्षांत त्यांनी इस्रोमध्ये काम केलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे.

मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) वर त्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या, 2014 मध्ये मंगळाच्या भोवती हे यान यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले होते. त्या सध्या प्रोजेक्ट मॅनेजर आणि मिशन डिझायनर म्हणून काम करत आहेत.
- अनुराधा टी.के
1982 मध्ये इस्रो मध्ये सामील झालेल्या शास्त्रज्ञ अनुराधा टी.के या उपग्रह प्रकल्प संचालक बनलेल्या पहिल्या महिला आहेत.

त्यांनी जीसॅट-९ (GSAT-9), जी सॅट-१७ (GSAT-17) आणि जी सॅट-१८ (GSAT-18) सारख्या तीन संचार उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यांनी कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे. इस्रोमध्ये 34 वर्षे काम केल्यानंतर त्या निवृत्त झाल्या.
- मौमिता दत्ता
भौतिकशास्त्रज्ञ मौमिता दत्ता यांनी मार्स ऑर्बिटर मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती चांद्रयान-1 सारख्या प्रकल्पांचा भाग होत्या.

त्या ऑप्टिकल आणि आयआर सेन्सर्स, उपकरणे आणि पेलोड्सच्या विकास आणि चाचणीमध्ये निष्णात आहेत. मंगळयानच्या यशानंतर त्या इस्रो टीम ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्सच्या मानकरी होत्या.
- व्ही.आर. ललिथांबिका
ललिथांबिका, गगनयानच्या संचालिका, इस्रोच्या 100 हून अधिक मोहिमांचा भाग आहेत. त्यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्या इस्रोच्या उपसंचालक होत्या. अंतराळ संशोधनातील योगदानासाठी, त्यांना प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानातील अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला आहे.
- मीनल रोहित
निरमा इन्स्टीट्य़ूट ऑफ टेक्नॉलॉजि ते इस्रो मीनल रोहित यांचा प्रवास हा अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष आहे. सिस्टम इंजिनिअर म्हणून त्यांनी मंगलयान मोहिमेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली.

इस्रोच्या उपप्रकल्प संचालक म्हणून त्यांनी चांद्रयान-२ मोहिमेस आकार दिला होता. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वत:चा अमीट असा ठसा उमटवलेला आहे.
चूल आणि मूल ही संकल्पना कालबाह्य ठरवणाऱ्या या भारताच्या आधुनिक दुर्गा आहेत. भारतातील करोडो मुलींसाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राच्या या खऱ्या अर्थाने लेडी बॉस आहेत.
–अर्चना सोंडे
More Stories
मधुराज रेसिपीचा प्रवास – मधुरा बाचल यांची खास मुलाखत