February 22, 2024

आज देवी ब्रह्मचारिणीचे पूजन

आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारीणीचे पूजन केले जाते. ब्रह्मचारिणी देवीची एक आख्यायिका आहे.

शास्त्रात असे सांगितले आहे की माता दुर्गा हिचा जन्म पर्वतराजाची कन्या म्हणून पार्वती म्हणून झाला. महर्षी नारदांच्या सांगण्यावरून तिने भगवान महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तिच्या हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येमुळे तिला तपस्विनी असे नाव पडले. कालांतराने हीच देवी पार्वती ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाऊ लागली. तपश्चर्येच्या काळात देवी पार्वतीने अनेक वर्षे उपवास करून आणि अत्यंत कठीण तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले. त्यांच्या तपश्चर्येचे प्रतीक म्हणून त्यांच्या या रूपाची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा आणि स्तुती केली जाते.

दुर्गेचा अवतार मानली गेलेली ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेमुळे विवाहातील समस्या दूर होतात अशी धारणा आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या तपसाधनेने देवीला महादेव पतीस्वरुपात प्राप्त होतील असा आशीर्वाद देवीला ऋषीमुनींनी दिला होता. त्यामुळे विवाहात अडचणी येणाऱ्यांनी ब्रह्मचारिणी देवीचे पूजन केले पाहिजे.

देवीच्या स्वरुपाविषयी
दधाना कपाभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।

देवी ब्रह्मचारिणीला जगाच्या चाल आणि अचल स्वरूपाचे ज्ञान आहे. त्यामुळे ती चाल आणि अचल विश्वाची देवी मानली गेली आहे. तर देवी ब्रह्मचारिणी ही पांढरे वस्त्र नेसलेल्या एका कुमारिकेचे रूप आहे. तिच्या एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. या जपमाळेला अक्षयमाळा म्हणतात. ब्रह्मचारिणी आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होते.टी भक्तांच्या पाठीशी लगेचच उभी राहते. इतर देवींच्या तुलनेत देवी ब्रह्मचारिणीचे रुप अतिशय भव्य असले तरी साधे आहे. तसेच ही देवी ती अतिशय कोमल, क्रोधमुक्त आणि त्वरित वरदान देणारी आहे.

देवीचा नैवेद्य
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवती देवीला साखर अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, साखर अर्पण केल्याने उपासकाला दीर्घायुष्य मिळते आणि निरोगी राहते. चांगले विचार येतात आणि माता पार्वतीची कठीण तपश्चर्या लक्षात घेऊन लढण्याची प्रेरणा मिळते.

देवी ब्रह्मचारिणी आणि पिवळ्या रंगाचे महत्त्व
ब्रह्मचारिणी मातेला पिवळा रंग खूप आवडतो, म्हणून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेची पूजा करण्याची पद्धत आहे. तसेच देवीला पिवळ्या रंगाचे कपडे आणि फुले अर्पण करावीत. पिवळा रंग आईच्या पालनपोषणाचा स्वभाव दर्शवतो. तसेच हा रंग शिकण्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच उत्साह, आनंद आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला गेला आहे.

देवी ब्रह्मचारिणी पूजनाचा मंत्र
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

देवी ब्रह्मचारिणी पूजन विधी
शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्यादिवशी ब्रह्म मुहूर्तावर देवी ब्रह्मचारिणीचे पूजा केले जाते. पूजेत पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जातो. सर्वप्रथम देवीला पंचामृताने स्नान घातली जाते. त्यानंतर गंध, अक्षता, चंदन इत्यादी अर्पण केले जाते. ब्रह्मचारिणीच्या पूजेमध्ये फक्त पिवळ्या रंगाची फुलांचा वापर केला जातो. देवीला नैवेद्यात फक्त दूध किंवा साखरेच्या वस्तू अर्पण केल्या जातात. यासोबतच देवीच्या मंत्रांचा जप केला जातो. दुर्गा सप्तशती, दुर्गा चालीसा पाठ केले जातात.