February 22, 2024

नवरात्रौत्सवाला सुरुवात : पूजन माता शैलपुत्रीचे

आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस. या दिवशी दुर्गेचे पहिले रुप माता शैलपुत्रीला पूजले जाते. माता शैलपुत्रीच्या पूजनाने घटस्थापनेचा प्रारंभ होतो. ओल्या मातीचा छोटा चौकोनी ओटा ‘वेदी’ करून त्यावर एका मातीच्या किंवा सोन्या-चांदीच्या कलशाची स्थापना करून त्यावर देवतेची स्थापना अश्विन शुक्ल प्रतिपदेला करावी हीच घटस्थापना. कलशाखालील ओल्या मातीच्या त्या ओट्यावर नवधान्यांची पेरणी करून रोज थोडे पाणी शिंपडायचे. त्यामुळे त्याला लुसलुशीत कोंब फुटतात. भविष्यातील भरघोस कृषीचे-उत्पन्नाचे हे सूचक प्रसाद चिन्ह. नवरात्रीचे नऊ दिवस या घटावर रोज एकेक माळ-नवदुर्गासाठी सोडायची. हाच नवरात्राचा शुभारंभ आहे.

या लेखाच्या सुरुवातीलाच उल्लेख केलाय की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते. माता शैलपुत्री ही राजा हिमालयाची कन्या आहे. , हिमालय हा पर्वतांचा राजा आहे. आजही या राजाची ओळख खंबीरवृत्तीचा राजा अशीच आहे. त्याची मुलगीसुद्धा तशीच गंभीर आहे, असे ओळखले जाते.

शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात. सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय. वडिलांच्या विरोधात जात सतीमातेने भगवान शिवांशी विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. यासाठी त्याने सर्व देवी-देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही.

देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते, पण तसे झाले नाही. ती त्या यज्ञाला जायला हताश होती. पण भगवान शंकरांनी नकार दिला. यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली.

शेवटी स्त्री हट्ट पुरवत शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली. सती जेव्हा तिचे वडील प्रजापीत दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते. त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते. पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही. केवळ आईने सतीमातेला प्रेमाने मिठी मारली.

एवढंच नाहीतर, सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच, सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला. खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या.

त्यांना स्वत:चा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता. त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वत:ला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले. दु:खाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले.

इथे आहे माता शैलपुत्रीचे मंदिर

शैलपुत्री माता काशी नगरी वाराणसी येथे आहे. तिथे शैलपुत्रीचे एक अतिप्राचीन मंदिर आहे, त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेदिवशी जो भक्त माँ शैलपुत्रीचे दर्शन घेतो. त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात, असेही म्हटले जाते.

माता शैलपुत्रीचे स्वरूप

माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत. हा नंदी शिवाचे रूप आहे. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची रक्षक देखील आहे. शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे. जे धर्म, अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे. तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो. डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे.

देवी शैलपुत्रीच्च्या उपासनेसाठीचे मंत्र

ऊँ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओम् शैलपुत्री देव्यै नम:।

यानंतर भोग आणि प्रसाद अर्पण करून माँ शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

ॐ शं शैलपुत्री देव्यै: नम:।

या मंत्राचाही १०८ वेळा जप करा. त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून भक्तीभावाने आरती करावी.

माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी

हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते. त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते. घटस्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गामातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करा.या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे, नद्या, समुद्र, नवग्रह, दिक्पाल, दिशा, नगर देवता, ग्रामदेवता यासह सर्व योगिनींना आमंत्रित करा.

एका लाकडी पाटावर लाल कापड पसरा. त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा, मूर्ती स्थापित करा. त्यावर कुंकू लावून ‘शम’ लिहा त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करा.

मातेचा नैवेद्य

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो.