May 25, 2024

अंधेरीमध्ये मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ निघाला कॅन्डल मार्च

अंधेरी- मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला. अंधेरी येथे देखील सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी कॅन्डल मार्च काढण्यात आला. एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक असा हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. या कॅन्डल मार्चला मराठा समाज बांधव आणि महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

हातात मेणबत्ती घेऊन ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत हा कॅन्डल मार्च शुक्रवारी सायंकाळी निघाला. ’या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’ असे नारे देत अंधेरी कुर्ला मार्गावरुन हा कॅन्डल मार्च पुढे जात राहिला.

“जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून आंदोलन केली जातील.  मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर मराठा बांधव याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते अशोक देसाई यांनी दिला. य़ा कॅण्डल मार्च मध्ये प्रमोद सावंत, प्रशांत सावंत, भरत पिसाळ, प्रशांत अनंत पवार, शिवनाथ खैरनार आदी मराठा व इतर विविध समाज पक्ष संघटनेचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.