February 22, 2024

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा अंधेरीतून निवडणूक लढणार का ?

अंधेरी : मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे सध्या अंधेरीच्या राजकारणात चर्चेत आहेत. प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फौंडेशनच्या दुसऱ्या कार्यालयाचे अंधेरीतील (Andheri East) मरोळ मरोशी रोड (Marol Maroshi Road) येथे रविवारी उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी प्रदीप शर्मा यांनी एमआयडीसी परिसरातील कोंडीविटा येथे   संपर्क कार्यालय उघडले होते. त्यामुळे आगामी काळात प्रदीप शर्मा हे विधानसभा निवडणुकीत उतरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार प्रदीप शर्मा हे आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील परिसरात चर्चा सुरू आहे. यापूर्वी प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेना पक्षाकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

प्रदीप शर्मा काय म्हणाले?

प्रदीप शर्मा यांनी म्हटले की, मागील आठ वर्षापासून समाजकारणात आहे. अंधेरीकरांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. नागरिकांनी त्या समस्या लेखी स्वरूपात या कार्यालयात द्याव्यात असे त्यांनी म्हटले. अंधेरी पूर्वेकडील प्रत्येक वार्डात कार्यालय उभारणार असून प्रत्येक वार्डातील कार्यालयात आठवड्यातून एकदा भेट देणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

प्रदीप शर्मा यांनी राजकारणातील प्रवेशावर थेट भाष्य करणे टाळले. सध्या मी समाजकारण करत असून राजकारण करत नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीबाबत वेळ आल्यावर पाहुयात असेही शर्मा यांनी म्हटले.

आमदार ऋतुजा लटके यांची वर्षपूर्ती

दरम्यान अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार ऋतुजा लटके (MLA Rutuja Latke ) यांच्या आमदारकीला 6 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी तत्कालीन आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मशाल चिन्हावर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र मतदानाच्या काही दिवस अगोदर भाजपने माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सुकर झाला. 66,530 मतांनी त्यांनी विजय मिळवला होता.

शिंदे गटाचा अंधेरीवर दावा ?

अंधेरीचा आमदार शिवसेनेचा असल्यामुळे शिंदे गटाने जर दावा या जागेवर दावा केला तर शिंदे गटाचे प्रदीप शर्मा हे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. मात्र भाजप अंधेरीवरील दावा सोडेल असं वाटत नाही. भाजपचे मुरजी पटेल (Muraji Patel) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच गेल्या दहा वर्षांत विविध कार्यक्रम घेऊन मुरजी पटेल यांनी हा मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्यासाठी हा मतदारसंघ सोप्पा नसेल अशी देखील चर्चा आहे.     

 

image source- google