May 18, 2024

एमआयडीसी अंधेरी येथे पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात १० वर्षाच्या मुलीला पडले तब्बल ४५ टाके

अंधेरी- भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटनेत वाढ होत असतानाच एका पाळीव कुत्र्याने लहान मुलीवर हल्ला केल्याची घटना एमआयडीसी (MIDC)अंधेरी(Andheri) येथील एका इमारतीमध्ये घडली. हा हल्ला इतका भयंकर होता कि सदर मुलीला ४५ टाके पडले सदर कुत्र्याच्या मालकाविरुद्ध पोलीस ठाण्य़ात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जर्मन शेफर्ड (German Shepherd)या गटातील हा कुत्रा असल्याचे समजते.

टाईम्स ऑफ़ इंडियाच्या वृत्तानुसार, २७ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी, अंधेरी येथील लोढा एटर्निस इमारतीच्या आवारात ही घटना घडलेली आहे. सदर १० वर्षांची मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेली असता त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा हा निसटला आणि त्याने त्या मुलीचा चावा घेतला. त्या मैत्रिणीच्या आईने काही गंभीर प्रकरण नाही असे म्हटले. मात्र शेजाऱ्यांनी कुत्र्याने केलेला हल्ला भयंकर होता असे म्हटले.

मुलीच्या पालकांनी मुलीला हिरानंदानी इस्पितळात नेले. डाव्या पायावर खोल जखम झाल्यामुळे मुलीवर शस्त्रकिया करण्यात आली. यावेळी तिच्यावर ४५ टाके घालण्यात आले.

इमारतीतील इतर रहिवाशांनी कुत्रा मालकास कुत्र्याकरिता प्रशिक्षकाची नेमणूक करावी अशी वारंवार विनंती केली होती. पण कुत्र्याच्या मालकाने ते ऐकले नाही.

इमारतीचे सेक्रेटरी गुरप्रीत सिंग उप्पल यांनी मुलीच्या पालकांना सदर प्रकाराची पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. उप्पल यांनी कुत्र्याच्या मालकाला देखील बोलावले पण तो आलाच नाही उलट तक्रार करण्याची त्याने धमकी दिली. कुत्र्याचा मालक या इमारतीत एप्रिल २०२३ पासून भाड्याने राहत आहे. उप्पल यांनी त्याच्या घरमालकास खात्री देण्यास सांगितले कि सदर कुत्रा इमारतीच्या आवारात दिसता कामा नये किंवा कुत्र्याच्या मालकास घर खाली करण्यास सांगावे. घरमालक परदेशात राहतो.

मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदविला असून कुत्र्याच्या मालकाविरोधात फ़ौजदारी प्रक्रिया संहिते नुसार कलम १५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच कुत्र्याने चावा घेण्याची ही तिसरी घटना असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे.