February 22, 2024

कचऱ्या संबंधी सगळ्या तक्रारींचे निवारण हा महापालिकेचा दावा खोटा असल्याचा अंधेरीतील सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप

अंधेरी : बृहन्मुंबई महानगरपालिकेने(BMC) गेल्या सात महिन्यांत कचऱ्याशी संबंधित 7,034 तक्रारींचे निराकरण केले आहे. महापालिका आकडेवारीनुसार, सध्या शहरात एकही तक्रार प्रलंबित नाही. तथापि, अंधेरीतील(Andheri) सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की महानगरपालिका खोटे दावे करत आहे, कारण अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला दिसतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानंतर पालिकेने कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट(Whatsapp chatbot) क्रमांक सुरू केला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (SWM) आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 7 जून ते 3 डिसेंबर दरम्यान 9,252 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 7,034 तक्रारी कचऱ्याशी संबंधित होत्या, 1,996 तक्रारी बेकायदेशीरपणे कचरा टाकल्याबद्दल होत्या आणि 95 तक्रारी कचरा जाळल्याच्या होत्या.

अंधेरीच्या वॉचडॉग फाऊंडेशनचे संस्थापक गॉडफ्रे पिमेंटा म्हणाले, “मुंबई महानगरपालिका खोटे दावे करत आहे. के पूर्व विभागात(K east ward), विशेषत: सहार गावातील कल्पा हॉटेलजवळ बेजबाबदारपणे घरगुती कचरा टाकला जातो. येथे ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्ब्या बाहेर कचरा पडलेला असतो. मी दोनदा तक्रार केली, पण तरीही समस्या कायम आहे.” अशाप्रकारे पिमेंटा यांनी महानगरपालिकेचा दावा खोटा ठरवलेला आहे.

व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर आलेल्या तक्रारी संबंधित वॉर्डात पाठवल्या जातात. महापालिकेचे पथक जीपीएस लोकेशनद्वारे त्या ठिकाणी भेट देते आणि कचरा उचलला जात असल्याची खात्री करते. “अशी काही ठिकाणे आहेत जिथे वारंवार कचरा टाकला जातो; नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणे थांबवले तरच समस्या कमी होईल,” असा दावा एका महापालिका अधिकाऱ्याने केला आहे.

दरम्यान एनजीओ प्रजा फाऊंडेशनने(Praja foundation) मे मध्ये दिलेल्या अहवालात घनकचरा व्यवस्थापन संबंधित नागरिकांच्या 2013 मधील 5,519 तक्रारींवरून 2022 मध्ये 12,351 पर्यंत वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2022 मध्ये जवळपास 4,356 तक्रारी असंकलित कचऱ्याशी संबंधित होत्या, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.