February 22, 2024

सीप्झ येथील जलवाहिनी गळती प्रकरणी कंत्राटदाराला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड

अंधेरी – सीप्झ (Seepz) येथे मेट्रोचे (Metro) काम सुरू असताना जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी १.३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. 50 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांना सोमवारी दुपारपर्यंत जलवाहिनीमधील गळती दुरुस्त करण्यात यश आले.

30 नोव्हेंबर रोजी एक कंत्राटदार मेट्रो प्रकल्पांसाठी ड्रिलिंगचे काम करत असताना गळती झाली. दरम्यान, जलवाहिनीचे नुकसान केल्याबद्दल ‘ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड’ या कंत्राटदाराला पालिका अधिकाऱ्यांनी १.३३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

दंडाच्या रकमेत 28 लाख रुपये पाणी अपव्यय शुल्क, 60.87 लाख रुपये दुरुस्ती शुल्क आणि 44.54 लाख रुपयांच्या पाण्याच्या अपव्यय शुल्काचा दंड आदींचा समावेश आहे.

दी इंडियन एक्सप्रेस वृत्तानुसार महापालिकेने कंत्राटदारासह एमएमआरडीए प्रकल्प संचालकांना (MMRDA) पत्र दिले. या पत्रावर महापालिकेच्या जल विभागाच्या सहाय्यक अभियंता (अंधेरी पूर्व) यांची स्वाक्षरी आहे. “असे निदर्शनास आले की महानगरपालिकेने दिलेल्या निर्देशांचे मेट्रोच्या कंत्राटदाराने पालन केले नाही ज्यामुळे 1,800 मिमी पाण्याचा मुख्य इनलेट खराब झाला. ज्यामुळे चार महापालिका प्रभागांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे, सदर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून कंत्राटदाराने ही रक्कम भरावी आणि ताबडतोब या कार्यालयात दंडाची पावती जमा करावी, असे महानगरपालिकेच्या पत्रात म्हटले आहे.

जलवाहिनीच्या नुकसानीमुळे के/पूर्व(K east ward) (अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मरोळ), के/पश्चिम (K west ward) (अंधेरी पश्चिम, जुहू, वर्सोवा, विलेपार्ले), एल (L ward) (कुर्ला) आणि एन (N ward) (घाटकोपर) या चार प्रमुख महापालिका प्रभागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.