February 22, 2024

देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींचा वापर करणाऱ्या मरोळमधील हॉटेलवर पोलिसांची धाड

अंधेरी- मरोळ(Marol) मधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त करताना गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जाते आणि हॉटेल व्यवस्थापकाचा यामध्ये सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर छापा टाकून संशयितांना अटक करण्यात आली.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, अंधेरीतील(Andheri) मरोळ भवानी नगर येथील सिल्व्हर क्लाउड हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचे रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या(Crime branch) युनिट 10 ला मिळाली. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी व्यवस्थापकाने अल्पवयीन मुलींची सोय केली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी एका अधिकार्‍याला गुप्त पद्धतीने ग्राहक म्हणून पाठविले. सदर अधिकाऱ्याने एका मुलीच्या सेवेची विनंती केली, त्यानुसार हॉटेलमध्ये आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला बोलावले. अल्पवयीन मुलगी आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुर्गा सिंग (३४) नावाची महिला दलाल आणि हॉटेल व्यवस्थापक मोहम्मद नावेद (२४) यांचा समावेश आहे. दुर्गा सिंग ही अल्पवयीन मुली पुरवायची.

युनिट 10 चे पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचे वय 12 वर्षे 4 महिने आहे. या कामांतून मिळणाऱ्या पैशात महिलेचाही वाटा होता. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींविरुद्ध कलम ३६३ (ए), ३७० (ए) (१), ३७२ आणि ३४, तसेच महिला आणि अनैतिक वर्तनाशी संबंधित कलम ४ आणि ५ त्याचप्रमाणे पॉस्को (POCSO) कायद्याचे कलम १६, १७, १८ नुसार कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.