April 21, 2024

अंधेरीतील पाणीपुरवठा संध्याकाळ पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता

अंधेरी- अंधेरीतील(Andheri) वेरावली(Veravali) सेवा जलाशयाची १८०० मिलिमीटर मुख्य जलवाहिनी वरील गळती दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्याकडे आहे. पुढील २ ते ३ तासात ही दुरुस्ती पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मुख्य जलवाहिनीमध्ये पाणी सोडणे, सेवा जलाशय भरून घेणे ही सर्व कार्यवाही करून आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होवू शकेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) एक्स अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

महानगरपालिकेची यंत्रणा मागील ५० तासांपेक्षा अधिक काळ दुरुस्तीसाठी अखंडपणे कार्यरत आहे. या प्रयत्नांना आता लवकरच यश येईल, अशी आशा आहे.

मेट्रो 6 लाईनचे खोदकाम सुरू असताना, गुरुवारी अंधेरी सीप्झ (SEEPZ) गेट क्रमांक 3 येथे 1,800 मिमी वेरावली मुख्य जलवाहिनीस गळती झाली. त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम आणि वांद्रे पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद झाला. शहराच्या इतर भागातही काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवली. शुक्रवारपासून घाटकोपर, भांडुप आणि पवईच्या काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. बीएमसीने शुक्रवारी पाईपलाइनच्या दुरुस्तीला सुरुवात केली होती, ती रविवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार होती, मिड डे च्या वृत्तात म्हटले आहे.