April 21, 2024

अंधेरीतील ५६ वर्षीय इसमाने दोन लहान मुलींचा केला ‘विनयभंग’

अंधेरी- घराबाहेर खेळत असताना नऊ आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन बहिणींचा विनयभंग(Child molestation) केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी(Andheri Police Station) एका ५६ वर्षीय इसमास अटक(arrest) केली आहे. मुलींनी शाळेतील शिक्षकांना विनयभंगाची माहिती दिली. शिक्षकांनी मुलींच्या आईला कळवले, त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. आरोपी हा पीडितेच्या शेजारी राहतो. रविवारी दुपारी दोन अल्पवयीन बहिणी घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्यांना जवळ बोलावून अयोग्यरित्या स्पर्श केला. मुली घाबरल्या आणि त्यांनी आईला सांगितले नाही. पण जेव्हा त्यांच्या शिक्षिकेने त्यांना काय घडले याबद्दल विचारले तेव्हा मुलींनी शिक्षिकेस आपल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर मुलींच्या शिक्षिकेने त्यांच्या आईला माहिती दिली, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. आईने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. अंधेरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मंगळवारी आरोपीला तो राहत असलेल्या परिसरातून अटक केली.

सदर इसमाने परिसरातील इतर मुलींना देखील लक्ष्य केले आहे का याची पोलीस तपासणी करत आहेत, असे पोलीस सूत्राने सांगितले. आरोपीवर भारतीय दंड संहिता(IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या(POSCO) संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.