June 13, 2024

आयकर विभागाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि बांधकाम व्यावसायिक राजीव दुबेंच्या घरावर धाड

अंधेरी- आयकर विभागाने कर चुकवल्या प्रकरणी माजी आयएएस अधिकारी निर्मल देशमुख, माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि विकासक राजीव दुबे यांच्या निवासस्थानी धाड टाकली.

आयकर विभागाच्या सूत्रानुसार, राजीव दुबे यांची अंधेरीतील मरोळ मध्ये स्टार विंग नावाची बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. सदर कंपनी या भागात अनेक प्रकल्प राबवत आहे. यामध्ये शर्मा यांचे आर्थिक हितसंबंध जुळले आहेत, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

बांधकाम व्यावसायिक राजीव दुबे हे माजी मंत्री रमेश दुबे यांचे चिरंजीव आहेत. रमेश दुबे हे अंधेरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेले होते. ते उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.

प्रदीप शर्मा यांचे अंधेरीत राजकीय दृष्ट्या वजन आहे. याचा लाभ घेत त्यांनी 2019 साली अंधेरी विधानसभेसाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेने त्यांना नालासोपारा मतदार संघातून उभे केले होते. या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. तीन वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अॅंटीलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना अटक केली होती. जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आल्यानंतर प्रदीप शर्मा हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले होते. भविष्यात अंधेरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचे कळते, असे देखील टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी प्रमुख आणि धारावी पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष निर्मल देशमुख यांची देखील या करचोरी प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांचे प्रदीप शर्मा आणि राजीव दुबे यांच्यासोबत काही संबंध असल्याची स्पष्टता नाही.