May 25, 2024

मरोळ मध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न

अंधेरी- हिंदू नववर्ष स्वागत समिती, मरोळ आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मंगळवारी पार पडली. या स्वागत यात्रेचे हे २४ वे वर्ष होते. अंधेरीतील शेकडो नागरिक या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.

मरोळ पोलीस कॅम्प समोरील पंचवटी सोसायटी येथून सकाळी 7.30 वाजता स्वागत यात्रेस सुरुवात झाली. मरोळ मरोशी मार्गे ही स्वागत यात्रा ढोल ताशांच्या गजरात मार्गक्रमण करत चालली. या यात्रेत शेकडो महिला- पुरुष- तरुण -तरुणी- ज्येष्ठ नागरिक – लहान मुले पारंपरिक वेशभूषा परिधान करून सामील झाले होते. हातात भगवे झेंडे, गुढ्या घेऊन हिंदुत्वाचा नारा देत होते. नऊवारी साडी, नाकात नाथ, डोक्यावर फेटा आणि डोळ्यावर गॉगल अशा पोषाखातील तरुणी महिला शक्तीचे दर्शन घडवत होत्या. नऊवारी साडीतील लहान मुली आणि कुर्ता पाय जम्यातील चिमुरडी मुले लक्ष वेधून घेत होते. पांढऱ्या शुभ्र कुर्त्या मधील चिमुरड्यांचे लेझिम पथक हे या स्वागत यात्रेचे आकर्षण ठरले.

मरोळ अग्निशमन दल केंद्रातील गणेश मंदिरातील गणेशाचे दर्शन घेत ही स्वागत यात्रा मरोळ मधील स्वयंभू पालेश्वर मंदिरात पोहोचली. येथे ब्रम्हध्वज उभारल्यानंतर सामुदायिक महाआरती घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना श्रीखंड -पुरी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

२४ वर्षापूर्वी अंधेरीत सर्वप्रथम रास्वसंघ, विश्व हिंदू परिषद यांच्यातर्फे सर्व सामाजिक मंडळ, संस्था यांना एकत्र करुन हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सूर्यकांत राणे यांनी नववर्ष स्वागत यात्राचे आयोजन केले होते. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना उमेश राणे म्हणाले, “गेल्या 24 वर्षांपासून मरोळ मध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे गुढी पाडव्या दिवशी आयोजन केले जाते. दरवर्षी या यात्रेमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंदू धर्माभिमानी आबालवृद्ध या यात्रेत सामील होतात. नवीन पिढी देखील मोठ्या उत्साहाने या यात्रेत सहभागी होत आहे हे या स्वागत यात्रेचे फलित आहे.”