May 19, 2024

अंधेरीच्या ममता प्रतिष्ठानने साजरी केली महापुरुषांची वैचारिक जयंती

अंधेरी- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘ममता प्रतिष्ठान’ने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा केला. सदर जयंती सोहळा रविवार १४ एप्रिल २०२४ रोजी पर्णकुटी, मरोळ पाईप लाईन, साईबाबा नगर, अंधेरी(पूर्व) येथे संपन्न झाला.

भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती, राज्यघटनेची प्रस्तावना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे माहिती प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन असे या वैचारिक जयंती सोहळ्याचे स्वरुप आहे.

सकाळी बुद्धवंदनेने जयंती सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश भोंगळे यांनी माहिती प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना अविनाश भोंगळे म्हणाले, “बाबासाहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. हजारो वर्षांपासून खितपत पडलेल्या समाजास नवसंजीवनी दिली. आज हा समाज शिकतोय, बाबासाहेबांचा विचार पुढे नेत आहे. ममता प्रतिष्ठानने आयोजित केलेला महापुरुषांचा  वैचारिक जयंती सोहळा हे त्याचे उदाहरण आहे. जयंती कशी साजरी करावी याचा आदर्श ममता प्रतिष्ठानने दिला आहे.’’

याप्रसंगी अविनाश भोंगळे यांचा उद्योजक सतीश लोखंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे शिल्प देऊन आणि व्यंकट जाधव यांच्या हस्ते `बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.   

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहीली हे सर्वश्रुत आहे. दलितांचे कैवारी म्हणून त्यांना एका वर्गापुरते बंदिस्त केले होते. परंतु त्यांनी भारतासाठी, भारतीयांसाठी केलेले कार्य विचारातीत आहे. हे कार्य नव्या पिढीला कळावे, त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावे, हा या वैचारिक जयंती सोहळ्याचा उद्देश आहे.

या जयंती सोहळ्यास विविध सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांनी भेट दिली. यामध्ये आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पत्रकार विलास जाधव, नितीन बाबर, संकल्प मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश राणे, अमित ससाणे, भारतीय युवा मंडळाचे जयवंत लोखंडे, प्रवीण खैरनार, उत्तर भारतीय एकता मंचचे वारिधी मिश्रा, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते राजू कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी भेट दिली.       

“अशा प्रकारची महापुरुषांची वैचारिक जयंती अंधेरी मध्ये पहिल्यांदाच होत आहे. ममता प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढी पर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करत आहेत. त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.’’ असे गौरवोदगार उमेश राणे यांनी काढले.    

सायंकाळी सामूहिक बुद्धवंदना व खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

अभिनव पद्धतीने महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा साजरा केल्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून ममता प्रतिष्ठानचे कौतुक होत आहे.