June 13, 2024

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी वरील पाणीटंचाईचं संकट टळलं

मुंबई: अंधेरी पूर्व येथे २२ मे रोजी होणाऱ्या पाईपलाईनच्या देखभालीचे काम मुंबई महानगरपलिकेने (BMC) रद्द केले आहे. त्यामुळे, गोरेगाव(Goregaon), जोगेश्वरी(Jogeshwari), अंधेरी(Andheri) आणि विलेपार्ले(Vileparle) भागात पाणीकपात किंवा पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, असे मुंबई महानगरपलिकेने शुक्रवारी सांगितले.

मुंबई महानगरपलिकेने यापूर्वी अंधेरी (पूर्व) च्या के पूर्व प्रभागात आवश्यक देखभाल कामाचे नियोजन केले होते. या ऑपरेशनमध्ये 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी आणि नवीन 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी (ज्याला पार्ले आउटलेट म्हणून ओळखले जाते) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडल्या जाणार होत्या. सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाणार होते.

या कामाला 16 तास लागणे अपेक्षित होते, त्यामुळे महापालिकेने 22 आणि 23 मे रोजी गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील काही भागात पाणीपुरवठा किंवा पाणीकपातीची घोषणा केली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव हे काम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवसात पाणीकपात होणार नाही, असे महापालिकेने म्हटल्याचे फ्री प्रेस जर्नलचे वृत्त आहे.