अंधेरी: अंधेरी पूर्व, महेश्वरी नगर येथे शनिवारी मुंबई महानगरपालिकेच्या नूतन ‘मुंबई पब्लिक स्कूल’ इमारतीचे शनिवारी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महापौर रितू तावडे आणि आमदार मुरजी पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शाळेपासून एमआयडीसी रस्ता क्र.16 हाकेच्या अंतरावर आहे. या रस्त्यावर नेहमीच पाणी साचलेले असते, पावसाळ्यात तर या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असते असं येथील रहिवाशी सांगतात.

शनिवारी पार पडलेल्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’ इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी व्हीआयपी पाहुण्यांची उपस्थिती असल्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र घाईघाईमध्ये नित्कृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. हे डांबरीकरण म्हणजे तात्पुरती मलमपट्टी असून पावसाळ्यात पुन्हा येथे खड्डे दिसतील अशी भीती स्थानिकांना वाटते.

