मुंबई : एका २३ वर्षीय ब्रेन डेड रुग्णाने (brain dead) त्याचे यकृत, किडनी आणि स्वादुपिंड(Organ) दान केल्यानंतर चार जणांना नवीन जीवन दिले आहे.
जोगेश्वरी येथील शुभम गराटे हा तरुण शनिवारी रेल्वेने त्याच्या मूळ गावी कोकणात जात असताना त्याचा अपघात झाला. सुरुवातीला त्यास स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याच दिवशी माहीम येथील एसएल रहेजा रुग्णालयात हलवण्यात आले.
“तो ट्रेनमधून कसा पडला हे आम्हाला माहीत नाही. तो शेवटपर्यंत बेशुद्ध राहिला,” मृत तरुण शुभमची बहिण मनालीने ही माहिती दिली. ब्रेन डेड घोषित करण्यासाठी डॉक्टरांनी पहिली स्लीप एपनिया चाचणी केली तेव्हा मनाली तिथे उपस्थित होती.
“ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता नव्हती. त्याचे अवयव जिवंत होते. आम्ही इतरांना नवीन जीवन देण्याचे ठरवले आणि अवयव दान केले,” मनाली म्हणाली.
एसएल रहेजा हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ट्रेनमधून पडल्यानंतर शुभमच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
प्रवक्त्याने सांगितले की, “या शोकांतिकेचा सामना करताना, कुटुंबाने अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला, गरजू व्यक्तींना आशा आणि जीवनाची दुसरी संधी दिली.” महाराष्ट्रात, जीवघेणी परिस्थिती असलेले 8,200 हून अधिक रुग्ण सध्या नोंदणीकृत आहेत आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
शुभमच्या अवयवदानामुळे(Organ donation) चारजणांना पुनर्जन्म मिळाला आहे. आपला मुलगा गमावल्याचे प्रचंड दुःख असताना देखील शुभमच्या कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयाने सगळ्यांना स्तब्ध केले.