May 5, 2024

महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये

मनसे नेत्या शालिनी ठाकरेंची जहरी टीका

अंधेरी- राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. असे म्हणत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी संजय निरुपम यांना महाराष्ट्र द्रोही व रवींद्र वायकरांना भ्रष्टाचारी म्हणत त्यांच्या उमेदवारीला आपला विरोध दर्शवला आहे.

यंदा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले. मात्र त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर ठाकरे गटात राहिले. ठाकरेंच्या सेनेने या मतदार संघातून अमोल कीर्तिकरांना तिकीट दिले. येथून इच्छुक असणारे माजी खासदार संजय निरुपम यांच्यासाठी हा धक्का होता. कॉँग्रेस पक्ष सेनेसमोर लोटांगण घालत असल्याचे म्हणत त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. दुसरीकडे माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर ईडीने धाड टाकली आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

निरुपम आणि वायकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असताना आता मनसेच्या नेत्या यांनी एक्स या समाज माध्यमावरून आपली भूमिका स्पष्ट केली. या दोघांच्या उमेदवारीला त्यांनी कडकडून विरोध केला आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.