मुंबई- कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान प्लेटलेट्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्स डोनेशनचा महत्त्वाचा वाटा असतो. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अन् सायन्स (Saint Wilfred College of Science, Arts & Commerce) येथे ” प्लेटलेट्स डोनेशन आणि कॅन्सर जागृती” या विषयावर विशेष चर्चासत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले. या जनजागृतीपर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्राध्यापक प्रतीक पी. चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रतीक चव्हाण यांनी आता पर्यंत ५० पेक्षा आधिक वेळा प्लेटलेट्स(Platelet) डोनेशन करून प्लेटलेट्स दाता म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
या उपक्रमादरम्यान कॅन्सरच्या विविध प्रकारांवर उपचार करताना केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची पातळी घटण्याचा धोका जास्त असतो म्हणूनच “प्लेटलेट्स डोनेशनमुळे रुग्णांचे प्राण वाचवता येतात. विशेषतः कॅन्सर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी प्लेटलेट्सचा पुरवठा वेळेत होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन प्रतीक चव्हाण यांनी केले. प्रतीक यांनी आता पर्यंत विविध सामाजिक संस्था सोबत एकत्रित येऊन प्लेटलेट्स डोनेशन केले आहे. प्रतीक ह्यांनी हाती घेतलेल्या या जागृतीपर कार्यामुळे समाजाला नवीन दिशा मिळेल अन् नवोदित तरुणांना प्रेरणा मिळेल असे वक्तव्य विल्फ्रेड महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रसिका वैद्य यांनी केले.
व्याख्यानादरम्यान प्रतीक यांनी प्लेटलेट्स डोनेशन प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक अटी, आणि दात्यांच्या आरोग्यावरील परिणाम याबाबत माहिती दिली. उपक्रमाचा उद्देश केवळ प्लेटलेट्स डोनेशनचे महत्त्व समजावून सांगणेच नव्हे, तर कॅन्सर जागृतीही करणे हा होता. या उपक्रमाला प्राध्यापक -विद्यार्थी वर्गांचा चांगला प्रतिसाद मिळाला.