अंधेरी – मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ बेस्टच्या बसने 50 हून अधिक जणांना धडक दिल्याचे (Kurla best bus accident) आणि या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अजूनही थंडावली नाही तोच मुंबईत बस चालवताना निष्काळजीपणाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) परिसरात शाळकरी मुलांना पिकनिकला(Picknik) घेऊन जाणाऱ्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे.
अंधेरी परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ(Western express highway) अंधेरी-कुर्ला रस्त्यावर(Andheri Kurla Road) सहार वाहतूक पोलिसांच्या(Sahar Traffic Police) नजरेस एक खाजगी बस दिसली, जी अडखळत पुढे जात होती. वाहतूक पोलिसांना संशय आल्याने अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बस थांबवण्यात आली.
बस थांबवून चौकशी केली असता चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत होते. ते दोघेही बसच्या सीटवरच झोपू लागल्याचे दिसून आले. ड्रायव्हर आणि क्लिनरच्या निष्काळजीपणाबाबत आत बसलेली लहान मुले आणि त्यांचे शिक्षक अनभिज्ञ होते. मुंबईच्या सहार विभागाच्या वाहतूक पोलिसांनी बस बाजूला थांबवून चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले.
मुंबईच्या सहार विभागाच्या वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, मुंबईतील साकीनाका येथील योगीराज श्रीकृष्ण विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बसमधून सहलीसाठी नेले जात असल्याचे समोर आले आहे. शाळेची सहल साकीनाका ते गोराई चौपाटीकडे निघाली होती. सकाळी साडेनऊ वाजता ही बस साकीनाका शाळेतून निघून अंधेरी-कुर्ला येथे पोहोचली, तेव्हा बसचालकाने बेशिस्तपणे बस चालवण्यास सुरुवात केली.
बसमध्ये सुमारे 40 मुले आणि शाळेचे शिक्षक होते. त्यांना ड्रायव्हर आणि क्लिनर नशेत असल्याची कल्पना नव्हती. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि पालकांना बोलावण्यात आले. चालक व क्लिनरला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात सहलीसाठी बससेवा टूर ऑपरेटर योगेश यादव यांनी दिल्याची माहिती आहे. चालक व क्लिनर दारूच्या नशेत असल्याने जबाब नोंदवता आला नाही. बससाठी दुसरा ड्रायव्हर देण्यात आला आणि बस मुलांच्या सहलीसाठी पाठवण्यात आली. सहलीवरून परतल्यानंतर बसही जप्त केली जाऊ शकते, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.