MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

घरातील डेब्रीज मुंबई महापालिका नेणार मोफत

मुंबई – घरांमध्ये साधा ओटा जरी बांधला तरी निर्माण होणाऱ्या डेब्रीजचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मात्र मुंबई महानगरपालिकेने(BMC) हा प्रश्न सोडवला आहे. आपल्या घरातील 500 किलो पर्यंतचे डेब्रीज महापलिका मोफत घेऊन जाणार आहे. त्या करिता खास टोल फ्री क्रमांक देखील उपलब्ध केले आहेत.

घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा अंतर्गत मुंबई शहर(Mumbai city ) व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक असेल. सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत या वेळेत हा क्रमांक उपलब्ध असेल. तसेच ‘मायबीएमसी’ (mybmc app)मोबाईल ऍपवरुनही 24 X 7 मागणी नोंदवण्याची सुविधा लवकरच नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

या सेवे अंतर्गत ५०० किलोग्रॅमपर्यंतची डेब्रीज संकलन सेवा मोफत दिली जाईल. मात्र त्यापेक्षा अधिक संकलनासाठी माफक दर आकारले जातील. ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेसाठी रक्कम देखील ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी पुढील २० वर्षांकरिता डेब्रीज संकलन, वाहतूक, निष्कासन व शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहे. जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण व तत्सम बाबींचा महानगरपालिकेवर कोणताही भांडवली खर्च नाही.

प्रतिदिन १२०० टन प्रक्रिया क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील(Maharashtra) सर्वात मोठ्या क्षमतेचा शास्त्रोक्त राडारोडा प्रक्रिया प्रकल्प तर ऑनलाईन सुविधा देणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा महापालिकेने त्यांच्या x या समाज माध्यमावर केला आहे.

प्रकल्पांमध्ये राडारोडा नेल्यावर त्याठिकाणी डेब्रीजवर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. त्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी वापरात येणार आहे.

घरगुती व लहान स्तरावरील डेब्रीज संकलनाचे प्रमाण वाढेल. पर्यायाने अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यापासून संबंधित घटक परावृत्त होतील व अशा प्रकारांना आळा बसेल, याची महानगरपालिका प्रशासनाला खात्री आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *