May 19, 2024

५६ व्या युवा महोत्सवात विवाने मिळविले घवघवीत यश

विरार : मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवाची अंतिम फेरी विद्यानगरी मुंबई विद्यापीठात पार पडली. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता महाविद्यालयीन जिल्हा पातळीवर विविध कलाप्रकाराच्या स्पर्धा घेतल्या जातात जसे की ललितकला, नृत्य, नाटक, संगीत आणि वाड्मय इत्यादी. या कला प्रकारात एकूण ४ विभागात पारितोषिके मिळवीत विवा महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले नाव विद्यापीठाच्या ट्रॉफीवर कोरले आहे.

लोकनृत्य स्पर्धेत विवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘दिवली’ नृत्य प्रकाराचे सादरीकरण करून भारतीय लोक नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. यासोबतच भारतीय गायन समूह (प्रथम क्रमांक), वेस्टर्न ग्रुप साँग ( द्वितीय क्रमांक), एकपात्री अभिनय ग्रुप ए ( तृतीय क्रमांक) पारितोषिके मिळवून युवा महोत्सवात विवा महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या अंतिम फेरीत एकापेक्षा एक अव्वल सादरीकरण करून सर्व स्पर्धकांनी आपले गुण, कौशल्य सादर करून परीक्षकांवर छाप सोडली. या चुरशीच्या स्पर्धेत विवाने आपला ठसा निर्विवादपणे उमटविला.

या स्पर्धेवेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक श्री.निलेश सावे, विभागीय फेरीत विजेते ठरलेले महाविद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.