May 19, 2024

अंगावर शिंकला म्हणून अंधेरीतील किशोरवयीन मुलाने जाळला मित्राचा चेहरा

अंधेरी: सोळा वर्षांच्या दोन मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर मंगळवारी अंधेरी पश्चिम(Andheri) येथे हिंसाचारात झाले. एकाने सॅनिटायझर(Sanitizer) टाकून पेटविल्यानंतर चेहरा गंभीर भाजला(Burnt). पीडित मुलाला तातडीने कूपर रुग्णालयात (Cooper Hospital)दाखल करण्यात आले आहे. त्याला आता शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. अल्पवयीन असलेल्या आरोपीला डीएन नगर पोलिसांनी(D.N.Nagar Police station) बुधवारी ताब्यात घेतले. सदर घटना गोल डोंगरी रोड, अंधेरी पश्चिम येथे घडली.

मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलगा मित्रांसोबत घराबाहेर पडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा होत्या. पीडित मुलाच्या आजीच्या म्हणण्यानुसार, पिडीत मुलगा मित्रांसोबत मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहत असताना एका मुलाच्या दिशेने शिंकला. शिंकताना तोंड न झाकल्याबद्दल दुसऱ्या मित्राने त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलावर पीडित मुलगा शिंकला होता तो मुलगा घरी गेला, त्याने कपडे बदलले आणि सॅनिटायझरची बाटली घेऊन परत आला.

“त्याने आपल्या शिंकणाऱ्या मित्रावर सॅनिटायझर ओतले, नंतर लायटरने आग लावली, पीडित मुलाच्या हुडीला आग लावली,” डीएन नगर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अन्य एका मित्राने आग विझवण्यास मदत केली आणि जखमी मुलाला घरी नेण्यात आले. या मुलाचा चेहऱ्याचा डावा भाग, कान व गळ्याचा भाग भाजलेला आहे.

कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या जखमी मुलाच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. भारतीय दंड संहितेच्या(Indian penal code) कलम 326 A (स्वेच्छेने ऍसिडचा वापर करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत आरोप असलेल्या आरोपी मुलाला सध्या सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, ज्यामुळे आरोपीला ताब्यात घेण्यात आले, असे हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.