May 18, 2024

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश अमिन भाजप मध्ये गेल्याने अंधेरीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार?

अंधेरी- प्रभाग क्र. 82 चे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी अमिन यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालय येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जगदीश अमिन यांनी दोन वेळा नगरसेवक पद भूषवलेले आहे. यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रभाग क्र. 216 कामाठीपुराचे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला.

सोमवार, 12 फेब्रुवारी हा दिवस माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कॉंग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्याने उजाडला. याच दिवशी दुपारी हा प्रवेश सोहळा देखील गाजला. जगदीश अमिन हे भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जात. नारायण राणेंनी आपल्या समर्थकांसह शिवसेना सोडली व कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला. त्यामध्ये जगदीश अमिन यांचा देखील समावेश होता. पुढे राणे भाजपवासी झाले मात्र जगदीश अमिन मात्र कॉँग्रेस मध्येच राहिले.

2012 च्या निवडणुकीत सुभाष कांता सावंत हे जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र झाल्यानंतर त्यांच्या जागी जगदीश अमिन यांची नगरसेवक पदी निवड झाली होती. 2017 साली जगदीश अमिन कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.

सुभाष कांता सावंत यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर जगदीश अमिन भाजपवासी झाले. दोघे माजी नगरसेवक एकाच प्रभागाचे प्रतिनिधित्व करायचे. एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे राहायचे. आता दोघे महायुतीत आल्याने दोघांमधील राजकीय वैर मिटून राजकीय मैत्रीत रूपांतर होईल का? त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढली तर ही जागा कोण लढवणार हा कळीचा मुद्दा आहे.

जगदीश अमिन यांच्या भाजपात येण्याने मुरजी पटेल यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काही अंशी फायदा होण्याची शक्यता आहे असे बोलले जाते. आगामी विधानसभेत मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व मधील भाजपाचा उमेदवार असतील हे निश्चित आहे. जगदीश अमिन जे पूर्वाश्रमीचे कॉँग्रेसवासी होते त्यांच्या राजकीय चेहऱ्याचा मुरजी पटेलांना मत परिवर्तनासाठी लाभ होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

एकूणच जगदीश अमिन यांच्या प्रवेशाने अंधेरीतील राजकीय समीकरणे बदलतील का हे पाहणे औत्सुकयाचे ठरेल. त्याचप्रमाणे अंधेरीतील अजून कोणता राजकारणी पक्षांतर करेल याची देखील सर्वसामान्यांना उत्सुकता आहे.