May 18, 2024

अंधेरीत मतिमंद भावाची बहिणीने केली हत्या

अंधेरी- शुक्रवारी अंधेरी (Andheri)परिसरात एका 62 वर्षीय महिलेला तिच्या 57 वर्षीय मतिमंद भावाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी महिला आपल्या भावाची काळजी घेण्यास कंटाळली होती आणि निराशेतून त्याची हत्या केली असे पोलिसांनी सांगितले.

सुरेंदर अहलुवालिया असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो मनीष नगर अंधेरी (पश्चिम) येथील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आपली बहीण अमरजीत अहलुवालियासोबत राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी अमरजीतने तिचा भाऊ सुरेंदरवर चाकूने हल्ला करून आणि दुपट्ट्याने गळा आवळून खून केला.

शेजाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि डीएन नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना सुरेंदर घरात मृतावस्थेत आढळले. अमरजीत अहलुवालियाने आदल्या रात्री सुरेंदर अहलुवालियाची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

अमरजीत अहलुवालिया या मतिमंद असलेला त्यांचा भाऊ सुरेंदरसोबत राहत असत. त्यांनी लग्न केले नव्हते. त्या वर्षानुवर्षे एकट्याने सुरेंदरची काळजी घेत होत्या आणि या गोष्टीला कंटाळल्या होत्या. यामुळे वैतागून त्यांनी शुक्रवारी भावाची हत्या केली. अमरजीतने आपला गुन्हा कबूल केला आहे, असे डीएन नगर पोलिस ठाण्याचे (D.N.Nagar Police Station) अधिकारी राजेंद्र मच्छिंद्र यांनी सांगितले.

“सुरेंद्र हा लहानपणापासूनच मतिमंद होता आणि त्याची काळजी घेणे कोणत्याही मुलापेक्षा कमी नव्हते. कधी ते जेवत नसत, तर कधी अमरजीत अहलुवालियाला खूप त्रास द्यायचे. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर, अमरजीत अहलुवालिया यांना त्यांची नोकरी सोडावी लागली आणि त्या एकट्याच भावाची काळजी घेत होत्या. पण जीवनाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले,” असे डीएन नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि दुपट्टा जप्त केला आहे. कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. “आम्ही अमरजीत अहलुवालियाला त्यांचा मोठा भाऊ, अंगदसिंग अहलुवालिया, (72) यांच्या तक्रारीवरून भारतीय दंडाच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत अटक केली आहे. आम्ही त्यांना शनिवारी न्यायालयातून ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत,” असे सदर अधिकाऱ्याने म्हटल्याचे दी इंडियन एक्सप्रेस वृत्तात माहिती आहे.