विरार- विरार येथील विवा इन्स्टिटूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे” असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता व अभिनेता रवी जाधव यांनी काढले. गुरुवारी विवा महाविद्यालयातील वार्षिक कला प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
रवी जाधव यांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा सपंन्न झाला. यावेळी संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर तसेच मार्गदर्शक राजू वनमाळी, अनिल ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. विष्णू वामन चॅरीटेबल ट्रस्टचे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट ह्या विरार पूर्व, शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी एफ ए ह्या पदवी मध्ये अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. समारंभाच्या सुरुवातीस प्राचार्या डॉ. संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामगिरीची दाखल घेऊन संस्थेच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेत पाहुण्यांचे स्वागत केले. या नंतर संस्थेने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, ७ वर्षापूर्वी सुरु केलेल्या ‘सन्मानपत्र’ बहाल करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.
वसईच्या मातीतील प्रसिद्ध शिल्पकार, हाडाचे कलावंत श्री. शांताराम चिंतामण सामंत म्हणजेच सर्वांना सुपरिचित असलेले श्री दत्ता सामंत यांचा ‘सन्मानपत्र’ बहाल करत यथोचित गौरव करण्यात आला. सदैव हसतमुख असे व्यक्तिमत्त्व लाभलेले व सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगणारे श्री.दत्ता सामंत यांनी वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना नवीन विधानभवनात अशोक स्तंभ बसवण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. सरांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये सर्वात महत्वाचा असा ‘महाराष्ट्र राज्य शासन’ पुरस्कार देखील समाविष्ट आहे. सरांच्या कलाजीवनावर विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रफीत कार्यक्रमाच्या वेळी दाखवण्यात आली.
याप्रसंगी शिखर ठाकूर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे रवी जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.










