मुंबई- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त(Mahaparinirvan Din) येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर(Mumbai city) आणि उपनगर जिल्हा(Mumbai suburban) येथे स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सहा डिसेंबर रोजी सुट्टी असणार आहे.
यापूर्वी १८ डिसेंबर १९९६ रोजीच्या परिपत्रकानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयाना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि साल २००७ पासून गोपाळकाळा ( दहीहंडी ) निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता साल २०२४ पासून मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर केलेली आहे.
येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनुयायांना शिस्तबद्ध पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या चैत्यभूमीतील स्मारकाचे दर्शन घेता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आदेश दिले आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.