अंधेरी- दिवाळीत दिपोत्सवानिमित्त छत्रपती शिवरायांचा गडकिल्यांचा वारसा जोपासण्यासाठी व नवीन पिढीला गडकिल्यांचे महत्व समजवण्यासाठी जय महाराष्ट्र क्रिडा मंडळ, मालपा डोंगरी नं २ यांच्यावतीने नरवीर सुभेदार तानाजी मालूसरे यांना स्मरून सिंहगड या किल्याची प्रतिकृती साकारली होती. या देखाव्याची श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांनी प्रशंसा केली व मंडळास सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले.
इतिहास अभ्यासक आप्पा परब, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, दादर येथील जागर गडदुर्गांचा, सन्मान गडदुर्ग साकारणाऱ्या मावळ्यांचा या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. हा सन्मान स्वीकारायला जय महाराष्ट्र क्रिडा मंडळाचे माजी अध्यक्ष कृणाल नाईक, शुभम नाईक, स्वयम कुलये, प्रणय कुलये व वेदांत सावंत उपस्थित होते.
”हे यश मंडळातील प्रत्येक लहान मोठ्या कार्यकर्त्याचे आहे. प्रत्येकाने यामध्ये आपला वाटा व वेळ दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सन्मान मंडळास प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुढील पिढीला गडकिल्यांचे महत्व कळावे यासाठी मंडळ हा वसा असाच निरंतर चालू ठेवेल,”अशी प्रतिक्रिया जय महाराष्ट्र क्रिडा मंडळाचे माजी अध्यक्ष कृणाल नाईक यांनी दिली.