MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

मुंबई महापालिका करणार अंधेरी जोग उड्डाणपुलाची दुरुस्ती

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western express highway)जीर्ण झालेल्या अंधेरी पूर्व उड्डाणपुलाच्या (Andheri flyover) एका भागाचा मोठा स्लॅब पाच महिन्यांपूर्वी मोटर गाडीवर पडल्यामुळे कारचालक किरकोळ जखमी झाला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता या उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

जोग फ्लायओव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उड्डाणपुलासाठी ₹95 कोटींचा खर्च अंदाजित आहे. मुंबई मनपा उड्डाणपूल दुरुस्त करेल आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (MMRDA) कडून झालेल्या खर्चाची मागणी करेल. एमएमआरडीएने वांद्रे ते दहिसर हा पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोग उड्डाणपुलासह, देखभालीसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये मुंबई मनपाकडे सुपूर्द केला होता. कागदावर, हा उड्डाणपूल राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मालकीचा आहे.

एमएनएस डॉट कॉमच्या वृत्तानुसार सदर उड्डाणपूलाचे प्रकरण न्यायालय प्रविष्ट असल्याने महापालिका आयुक्त भूषण गगराणी (BMC commissioner Bhushan Gagrani) यांनी मनपा दुरुस्ती करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रवाशांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता गगराणी यांनी दुरुस्तीच्या कामात आणखी विलंब न करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्लॅब कोसळण्याच्या एक आठवडा आधी 23 जून रोजी प्रकाशित झालेल्या अहवालात, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) द्वारे एप्रिल 2023 मध्ये सादर केलेल्या ऑडिट अहवालाचा हवाला देऊन उड्डाणपूल जीर्ण आणि अनिश्चित स्थितीत असल्याचे घोषित केले होते. एका महिन्यात उड्डाणपुलाची दुरुस्ती करावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची(Maharashtra assembly election) आदर्श आचारसंहिता उठवण्यात आल्याने दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर जारी करण्यात आल्याचे मनपा अधिकारी म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने तेव्हा महापालिका उपआयुक्तांना राज्य विभाग, हिरानंदानी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, महाकाली फ्लायओव्हर कंपनी लिमिटेड आणि जोग इंजिनिअरिंग लिमिटेड यांच्यातील उड्डाणपुलाबाबत सुरू असलेल्या खटल्याबद्दल माहिती दिली होती.