अंधेरी विधानसभेच्या रिंगणात 12 उमेदवार, जाणून घ्या आर्थिक, शैक्षणिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी
अंधेरी- 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अंधेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी 12 उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत. पण खरी लढत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार व विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके आणि महायुती मधील शिवसेना पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या मध्ये. त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे कुंदन वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. संजीव कलकोरी हे देखील आपले नशीब आजमावत आहेत.
इतर अन्य उमेदवारांमध्ये बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत, स्वाभिमानी पक्षाच्या प्रेमा फ्लेविया, राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे अॅड प्रदीप सोनवणे, राष्ट्रीय उलेमा काऊंसिलचे कौसर आली जाफर अली सैय्यद, आपकी अपनी पार्टीचे बाला नाडर, राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज नायक हे उमेदवार आपापल्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर पहलसिंग औजी आणि फरहाना सैय्यद अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार अंधेरी विधानसभा मतदारसंघातील या 12 उमेदवारांमध्ये महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल हे सर्वांत जास्त श्रीमंत आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 14,76,47,443 रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची मालमत्ता 10,96,03,500 रुपये इतकी आहे. सर्वांत कमी मालमत्ता बसपाचे उमेदवार कुंदन वाघमारे यांची असून ती फक्त 5 हजार रुपये इतकी आहे.
या 12 उमेदवारांमध्ये 2 उच्च पदवीधर, 3 पदवीधर आहेत. शिवसेनेचे उमेदवार मुरजी पटेल व राष्ट्रीय उलेमा कौन्सिलचे कौसर अली यांचे सर्वांत कमी, 8वी पर्यंत शिक्षण झाले आहे.
वरील 12 उमेदवारांमध्ये शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. खोटे दस्तऐवज बनवण्याशी संबंधित आरोप (IPC कलम-464), फसवणुकीसाठी शिक्षेशी संबंधित आरोप (IPC कलम-465),
बनावट कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (IPC कलम-471) अस्सल म्हणून वापरण्याशी संबंधित आरोप त्यांच्यावर असून मुंबई उच्च न्यायालयात हा खटला सुरू आहे.
उमेदवारांमध्ये प्रदीप सोनवणे हे वयाने सर्वांत ज्येष्ठ उमेदवार असून त्यांचे वय 66 आहे तर बाला नाडर हे सर्वांत तरुण उमेदवार आहेत. त्यांचे वय 32 इतके आहे.
वरील सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होईल तर निकाल शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी असेल.