अंधेरी: वाहतूक पोलिसाच्या पायावर बाईक चालवून गंभीर जखमी केल्याबद्दल मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणास अंधेरी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना अंधेरी घाटकोपर लिंक रोड येथे घडली. या मार्गावर असलेल्या साटमवाडी जंक्शन येथे सहार वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. रविवारी पहाटे 1.15 वाजता वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेले पोलीस शिपाई प्रीतम ओमासे यांनी संशयास्पद हालचाल पाहून बाईकस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने थांबण्याऐवजी बाईक थेट ओमासे यांच्या पायावर चालवली. यावेळी ओमासे यांच्या हातात असलेले श्वसन तपासणी यंत्र (ब्रेथ लायझर) देखील खाली पडले.
या प्रकारात वाहतूक पोलिसाच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर पोलिसांनी त्वरित बाईकस्वार व्हि. पी.सिंह (41) यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि शासकीय कर्मचाऱ्याला इजा पोहोचवणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
