अंधेरी- ममता प्रतिष्ठानने दोन दिवसीय ‘महापुरुषांचा वैचारिक जयंती सोहळा’ नुकताच पर्णकुटी, साईबाबा नगर, मरोळ, अंधेरी (पूर्व) येथे साजरा केला. भारतीय राज्यघटनेची प्रतिकृती, राज्यघटनेची प्रस्तावना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे, नाथपंथी डवरी गोसावी समाज आणि मातंग समाज यांचा इतिहास आणि आदर्श व्यक्ती यांचे माहिती प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आदींचे उदघाटन सोमवार, १३ एप्रिल एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता पार पडले.
यावेळी रेल्वे, बँकिंग क्षेत्रातील नोकरी भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रेल्वेचे अधिकारी प्रशांत डोळस आणि माजी अधिकारी एस. के. सिंग यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भाजप नेते उमेश राणे, अॅड. अमित ससाणे देखील उपस्थित होते.
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर संविधान म्हणजे काय? या विषयावर वकील व संविधान अभ्यासक अॅड.निलेश जगन्नाथ खानविलकर यांनी व्याख्यान दिले. यावेळी कॉँग्रेसचे नेते इमरान शेख उपस्थित होते.
सायंकाळी 7.00 वाजता धम्म अभ्यासक नैनेश जगताप यांनी बुद्ध धम्माविषयी माहिती दिली. त्यानंतर मातंग समाज आधुनिक होत आहे का? या विषयावर लेखक आणि दै. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत आणि ‘नाथपंथी डवरी गोसावी समाज : काल, आज आणि उद्या’ या विषयावर महाराष्ट्र शासन ‘समाज भूषण पुरस्कार’ सन्मानित भटक्या व विमुक्त जाती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी व्याख्यान दिले.
यावेळी वंचित घटकातील कर्तृत्ववान अशा उच्चशिक्षित डॉ.निशांत राजेंद्र बोराडे, इंजि. स्वप्नील प्रेमजी सूर्यवंशी आणि उद्योजिका संजना नैनेश जगताप या गुणीजनांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. प्रतिभा शिंदे आणि डॉ. प्रज्ञा सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक प्रमोद पांडुरंग सावंत उपस्थित होते.
महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीला कळावे हा या महापुरुषांच्या वैचारिक जयंती सोहळ्याचा उद्देश होता, असे ममता प्रतिष्ठानचे सचिव प्रमोद सावंत यांनी म्हटले. या आगळ्या वेगळ्या जयंतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या सोहळ्यास शिवसेना उबाठा पक्षाचे प्रभाग क्र. 75 चे उपशाखाप्रमुख भगवान तिर्लोटकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे मोहन जगताप, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे युवा नेते दीपक शिंदे, मातंग समाजाचे नेते आनंद शिंदे, भारतीय युवा मंडळाचे पदाधिकारी प्रवीण खैरनार, मिलिंद खैरनार, उत्तर भारतीय मंचाचे पदाधिकारी वारिधी मिश्रा, शिवसेनेच्या महिला नेत्या दीपिका तावडे, युवा नेता विशाल सिंग, नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे कार्यकर्ते तानाजी शिंदे, राजू गरुड, हरीदास कांबळे, रोहिदास कांबळे, पत्रकार सुभाष हनमंते, दीपक कोष्टी, वेंकट जाधव, केतन परब, सुशीम कुऱ्हाडे, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते राजू कदम, आनंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश कांबळे, कुणाल बनसोडे, सतीश लोखंडे, सिद्धार्थ सेवा संघचे अध्यक्ष विलास सावंत, संजय सावंत आदींची विशेष उपस्थिती लाभली.
सोहळ्यातील इन्फोग्राफीक प्रदर्शनाचे संपूर्ण डिजायनिंग उदयोन्मुख कलाकार वेदान्त सावंत यांने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हर्षल परब, शाम वासरे, नैनेश जगताप, विनोद सावंत, राजीव सवने, शशांक सावंत, किरण कांबळे, सुयोग शिरसट, योगेश सदामत, प्रवीण कांबळे, ओमकार जाधव, आदित्य जाधव, कुमार साई, ममता सावंत आदींनी परिश्रम घेतले. नेत्रिका सवने यांनी बुद्धवंदना म्हटली. सोहळ्याचा समारोप खीरदानाने करण्यात आला.
























