वर्सोवा- मुंबईतील वर्सोवा(Versova) परिसरात एका अर्भकाचा(Infant) मृतदेह सापडला असून त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईच्या उपनगरातील वर्सोवा येथे पोलिसांनी कागदात गुंडाळलेल्या नवजात बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून बाळाच्या पालकांविरुद्ध पोलिसांनी बीएनएस कलम 94 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, 15 डिसेंबर रोजी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार प्रकाश क्षीरसागर यांना वर्सोवा येथील एका अर्भकाबाबत नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळाला होता. क्षीरसागर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
एफआयआरमध्ये शिरसागर यांनी दिलेल्या जबाबानुसार, अर्भक कागदात गुंडाळून घराजवळ टाकून दिले होते. अर्भकाच्या अंगाला कावळे टोचताना दिसले. पोलिसांनी तत्काळ पक्ष्यांना हाकलून लावले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कागद अर्भकाच्या त्वचेला चिकटले होते यावरून हे सूचित होते की अर्भकास गुपचूप सोडून देण्यात आले होते.”
बाळाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी बाळाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलीस बाळाच्या पालकांचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.