विवा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लिहिलेल्या “पीपल वी नो” व “क्विक थेरपी” या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
विरार: विवा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग आणि इंग्लिश लिटररी असोसिएशन यांच्या सहकार्याने कला शाखेतील विद्यार्थिनी नवोदित लेखिका साक्षी पांडिया आणि श्राव्या यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कु.साक्षी पंड्या आणि कु.श्रव्या या एसवायबीए वर्गातील इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी आहेत. साक्षी पांड्या हिचे “पीपल वी नो” हे पुस्तक आत्म-प्रेम आणि जागरुकतेचे दर्शन घडविणारी कादंबरी आहे तर श्रव्याचे पुस्तक “क्विक थेरपी” हा कवितांचा संग्रह आहे. या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल, इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ.विद्या वर्मा व डॉ.झेबा सिद्दीकी यांच्या हस्ते झाले.
पुस्तके नेहमीच नव्या विश्वाची द्वारे खुली करत असतात. मानवाला अंतर्दृष्टी, प्रतिबिंब आणि उमज देतात. हे पुस्तक विश्वास, परिस्थिती आणि निवडी यांनी गुंफलेल्या जीवनाच्या गुंतागुंतीच्या रहस्याचा शोध घेते. त्याच बरोबर ही प्रगल्भ कादंबरी मानवी नातेसंबंधाचे सार आधोरेखित करते.
श्रव्याचे पुस्तक “क्विक थेरपी” हा कवितांचा संग्रह आहे. या कविता मानवी स्वभाव , मानसिक अवस्था अन् त्यांचे प्रतिबिंब कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. विद्यार्थी दशेत असताना पुस्तकांचे झालेले प्रकाशन कौतुकास्पद बाब आहे. यामुळे साहित्य क्षेत्राचे भवितव्य उज्वल असून येणारा काळ हा तरुण साहित्यिकांचा काळ म्हणून ओळखला जाईल. सोबतच येणारा काळ साहित्यासाठी पर्वणीच असेल, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी श. अडिगल यांनी व्यक्त केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उप प्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या डॉ. दिपा वर्मा यांनी शुभेच्छा दिल्या.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव होता, ज्यामुळे त्यांना मौल्यवान अंतर्दृष्टी आणि प्रेरणा मिळाली. शेवटी, एफवायबीएचे विद्यार्थी अमित सहानी यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.