विरार: आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जाहिरातीने होत असते. आपण दिवसभर वेगवेगळ्या ब्रँडच्या घोळक्यात फिरत असतो. जाहिराती, माध्यमे व ब्रँड्स यांच्या शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जाहिरातीच्या माध्यमातून आपण उत्पादनाची खरेदी – विक्री करत असतो. माध्यमांच्या विद्यार्थांना तर जाहिराती हा अभ्यासातील अमुलाग्र भाग मानला जातो म्हणूनच दरवर्षी विवा महाविद्यालयात बीएएमएमसी विभागातर्फे ‘एक्सप्रेशन’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
यंदा एक्सप्रेशनचे १९ वे वर्ष असून यावेळी “स्पुकी व्हिजन” ही थीम निवडण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यंदा जाहिरातीतील हॉरर अपील संकल्पना निवडण्यात आली होती. भयावह अंदाजात संवाद बांधणी, पात्र रचना आणि जाहिराती प्रकार यांचा वापर करून जाहिराती बनवायच्या होत्या. या कार्यक्रमामध्ये माध्यमांचा अप्रतिम मेळ पाहायला मिळाला. प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन कमर्शिअल, रेडिओ जिंगल्स, शार्क टँक इत्यादी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या.यंदा या कार्यक्रमात बीएएमएमसी विभागाचे गीत प्रदर्शित करण्यात आले. हे गीत माजी विद्यार्थी श्रेयस पाटील यांनी लिहले.
या कार्यक्रमाला सहदेव मंगेश राऊळ ( क्रिएटिव्ह बिग आयडिया कम्युनिकेशन) परीक्षक म्हणून लाभले. बीएएमएमसी विभागाचे सहा. प्राध्यापक तृप्ती पाटील व सहा. प्राध्यापक बाळकृष्ण अईर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून उमंग प्रॉपर्टीज, खोपरे बंधू, अरेना ऍनिमेशन आणि जय खंडोबा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांनी मोलाचे सहकार्य केले. विभागाच्या प्रमुख शाहीन महिडा यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी उत्पादन, ब्रँड यांचा उपयोग करून अप्रतिम जाहिराती तयार करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध विभागातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.