विरार : महिला दिनाच्या निमित्ताने विवा महाविद्यालयात ‘विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि महिला सक्षमीकरण कक्ष आणि यंग स्टार ट्रस्ट, आगाशी पुरस्कृत ‘स्त्रियांची शतपत्रे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. स्वाती कर्वे यांनी साधारणतः 200 वर्षांपूर्वी मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये महिलांनी लिहिलेल्या पत्रातील आधारित ग्रंथातील काही निवडक पत्रांचे अभिवाचन या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या अभिवाचनाने झाली. या कार्यक्रमात अभिवाचक म्हणून दिपाली शहाणे, नेहा किणी, जान्हवी दरेकर, नमिता तेंडुलकर आणि सागर रानडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी पत्रांतील विचार आणि भावना श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या.
नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत १९ व्या आणि २० व्या शतक गाजवणाऱ्या महिलांचे विविध विषयांवरील विचार आयोजित अभिवाचनातून ऐकायला मिळाले. त्या काळातील समाजव्यवस्थेनुसार महिलांची रोखठोक भाषा, मुद्देसूद मांडणी आणि स्त्री-पुरुष समतेचा प्रगल्भ विचार याचे दर्शन श्रोत्यांना या कार्यक्रमातून घडले.
स्त्री शिक्षणाची तळमळ, वर्णभेद, आंतरजातीय विवाह, पुनर्विवाह, स्त्रियांचे कैवारी, विधवा स्त्रियांचे कुंकू, प्रापंचिक कामाचा मोबदला पत्नीला मिळावा असे मथळे असलेल्या पत्रांनी शिक्षण हेच स्त्रीला समृद्धीकडे नेऊ शकते हे पटवून दिले.
कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शक विलास पगारे यांची होती, तर निर्मिती प्रमुख देवेंद्र प्रभूदेसाई यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच, सागर रानडे यांनी आपल्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला वेगळेच वजन दिले.
या समृद्ध अभिवाचनातून श्रोत्यांना प्रगल्भ अनुभव घेता आला. या कार्यक्रमाला विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. श.अडिगल, उप प्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या डॉ.दीपा वर्मा, महिला सक्षमीकरण कक्ष समिती प्रमुख डॉ.प्राक्तना कोरे यांचे सहाय्य लाभले. कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका हर्षवर्धिनी बोरणकर यांनी विवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि महिला सक्षमीकरण कक्षाचे आभार मानत उपस्थितांचे अभिनंदन केले.