May 5, 2024

‘प्रभात’चे सुधीर नांदगावकर यांचे निधन

ठाणे : मुंबईतील प्रभात चित्र मंडळाचे संस्थापक, भारतीय व जागतिक चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक सुधीर नांदगावकर (८४) यांचे १ जानेवारी २०२३ ला रविवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ठाण्यात माजीवडा येथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी २ डिसेंबर २०२३ ला सकाळी साडेदहा वाजता बाळकुम येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिनेमा आणि संस्कृती, फिल्म सोसायटी चळवळ ‘शोध आणि बोध’, ‘अभिजात’ ही अनुवादित पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. गुरुदत्त यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सत्यजित रे मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. मुंबईत ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हल सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एशियन फिल्म फेस्टिव्हलचे ते संचालक होते. नांदगावकर यांचा जन्म ११ जून १९३९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. त्यांनी कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ‘वास्तव रूपवाणी’ या प्रभात चित्र मंडळाच्या नियतकालिकाचे ते संपादक होते. मराठी जनांना सिनेमा साक्षर आणि शहाणे करण्यासाठी त्यांनी फिल्म सोसायटी चळवळ सुरू केली. काही ज्येष्ठ चित्रकर्मींना सोबत घेऊन त्यांनी प्रभात चित्र मंडळ स्थापन केले.’फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’मध्येही ते सक्रीय होते.