May 3, 2024

विवा महाविद्यालयात १८ व्या आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन अधिवेशन कार्यशाळा संपन्न

विरार : विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी १८ व्या आंतर महाविद्यालयीन अविष्कार संशोधन अधिवेशन २०२३-२४, झोन ५, जिल्हा पालघर व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यातील २५ महाविद्यालयीन संस्था व वाणिज्य, कला व विज्ञान शाखेतील एकूण १३० प्राध्यापक विद्यार्थी वर्गाने या कार्यशाळेचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. या कार्यशाळेसाठी डॉ. ससीकुमार मेनन ( डायरेक्टर, ॲडवान्स रिसर्च इंटर डीसिप्लनरी सायन्स ) , प्रा.डॉ. सुनिता शैलजन (प्रमुख, संशोधन विकास व अधिवेशन कोर्स व हर्बल रिसर्च लॅब), डॉ. मीनाक्षी गुरव (ओएसडी, अविष्कार संशोधन अधिवेशन, मुंबई विद्यापीठ), डॉ.मनीष देशमुख (सह समन्वयक, अविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा), उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे (विवा महाविद्यालय), उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा (समन्वयक, अविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थी जीवन जगत असताना विद्यापीठ व राज्य पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता अविष्कार तसेच विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन मुंबई विद्यापीठाद्वारे केले जाते. दिवसेंदिवस नवीन संशोधन निर्माण होऊन राष्ट्र निर्मितीचे कार्य व्हावे याकरिता राज्य व केंद्र सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सर्वांची तयारी विद्यार्थी जीवन जगत असतानाच महाविद्यालयातून व्हावी याकरिता विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित केलेल्या या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये संशोधन म्हणजे नेमके काय असते. संशोधनाचे महत्त्व, संशोधनाचे विविध प्रकल्प कशा पद्धतीने करावे. संशोधन विषय निवडून संशोधन समस्येवर कशाप्रकारे कार्य करावे जेणेकरून संशोधन योग्य पद्धतीने होईल. संशोधन हे लोकोपयोगी व विज्ञान पद्धतीवर, वस्तुनिष्ठ पद्धतीवर आधारित असायला हवे यासंदर्भातील अधिक माहिती प्रात्यक्षिक उदाहरणे देऊन डॉ. ससीकुमार मेनन व प्राध्या. (डॉ.) सुनीता शैलजन या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संशोधन करत असताना संशोधनाच्या अटी व नियमावली माहिती असणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा संशोधन करत असताना विद्यार्थ्यांना नियम व अटी माहिती नसल्याने विद्यार्थी या स्पर्धेमधून बाद होतात. संशोधन करत असताना संशोधनाचे नियम व अटी, आवश्यक असणाऱ्या पात्रता, शासनाद्वारे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पातळीवर विद्यार्थ्यांना दिले जाणारे बक्षीस, विविध स्कॉलरशिप यांच्या बद्दलची माहिती डॉ. मनीषा गुरव यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील अविष्कार संशोधन अधिवेशन संदर्भात कार्यपद्धती आढावा व विविध विद्यालयात संशोधनाचे चालत असलेले विविध प्रकल्प व भविष्यकालीन संधी याबद्दलची माहिती पालघर जिल्हा समन्वयक डॉ. मनीष देशमुख यांनी दिली.

ही कार्यशाळा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध संशोधन विषय देवून विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी विशेष चर्चा सत्र घडवून आणण्यात आले. या कार्यशाळेला अन्वेषण राष्ट्रीय विद्यार्थी संशोधन अधिवेशन स्पर्धा प्रथम विजेता स्वराज मिश्राने संशोधन स्पर्धा क्षेत्रातील आपला प्रवास उलगडून सांगितला व विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील सुवर्ण संधी बद्दल मार्गदर्शन केले.

या संशोधन कार्यशाळेला मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अविष्कार संशोधन अधिवेशनाचे स्थानिक समन्वयक डॉ.रोहन गवाणकर यांनी केले.