May 19, 2024

अंधेरी येथे कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार, मुलगी जखमी

अंधेरी- कार चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने कारच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश गुप्ता (४७) असे मृताचे नाव असून, त्यांची विवाहित मुलगी दीपाली मनोज कुमार ही त्यांच्यासोबत होती, ती जखमी झाली. अपघातानंतर, आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला, आरे पोलिसांनी(Aarey Police station) त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील (JVLR) अदानी इलेक्ट्रिक सिटी बस स्टॉपजवळील पेट्रोल पंपासमोर सोमवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. फिर्यादी बिंदो गुप्ता या पती सुरेश आणि दोन मुलांसह मालाड(Malad) येथील मार्वे रोड, राठोड गाव येथे राहतात.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, किराणा दुकानाचे मालक असलेले सुरेश गुप्ता सोमवारी सकाळी ९ वाजता गोवंडी(Govandi) येथे आपल्या मुलीला घेण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते आपल्या मुलीसह अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून मालाडच्या दिशेने परतत होते. ते जेव्हीएलआर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात सुरेश आणि त्यांची मुलगी दीपाली हे दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अंधेरीतील कामगार रुग्णालयात(ESIC Hospital) नेले, नंतर त्यांना कूपर रुग्णालयात(Cooper Hospital) हलवले. दुर्दैवाने सायंकाळी साडेचार वाजता सुरेशला उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले, तर दीपाली यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

बिंदो गुप्ता यांच्या तक्रारीच्या आधारे, आरे पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.