विरार : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालय संचलित राज्यातले रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पहिले सुसज्ज चार चाकी वाहन प्रशिक्षण केंद्र विवा मोटर ड्राइविंग स्कूल उभारले गेले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या घटना कमी करणे, वाहतूक नियम , हेल्मेट सक्ती प्रबोधन, रस्ता सुरक्षा उपाय आणि वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित आणि मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश ठेवून विवा महाविद्यालयातील करिअर कट्टा आणि विवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित केला गेला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.श्रीपाद भागवत ( आरटीओ, वसई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक) , श्री.जयदीप झांबरे (आरटीओ, वसई येथील पोलीस सहाय्यक निरीक्षक) आणि श्री.अजिंक्य फड, ( आरटीओ, वसई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक) , नारायण कुट्टी ( महाविद्यालय समन्वयक) आयक्यूएससी समन्वयक व उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा , डॉ दीपा दळवी, वैभव सातवी, विवा मोटर स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख मान्यवरांनी रस्ता सुरक्षा प्रोटोकॉल, वाहतूक नियम आणि अपघात कमी करण्यासाठी त्यांचे पालन करण्याचे महत्त्व यांसारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. रस्ते सुरक्षेविषयीच्या वाढत्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करणे महत्वाचे आहे असे वक्तव्य प्रमुख पाहुण्यांनी केले. या सत्रात संवादात्मक चर्चेचाही समावेश होता, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेना, डीएलएलइ, करिअर कट्टा आणि अन्य विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थी , प्राध्यापक -कर्मचारी सदस्यांसोबत सुमारे २०० जणांनी उपस्थिती लावली.
सर्व सहभागींनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच मिळाले नाही तर त्यांना त्यांच्या उर्वरित उज्वल आयुष्यासाठी सुरक्षित रस्त्यांचे, सुरक्षित वाहन वापर करण्याची प्रेरणा देखील मिळाली.
या रस्ते सुरक्षा कार्यक्रमासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, ट्रस्टचे खजिनदार शिखर ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल , उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या आयक्यूएससी सहसमन्वयक डॉ. रोहन गवाणकर, विवा मोटर स्कूल सदस्य, विद्यालयाच्या करिअर कट्टा कमिटी सदस्य यांच्याद्वारे केले गेले.