MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

Education NEWS

विवा महाविद्यालयात भरला “वी – बाजार”

उत्पादन विक्रीच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना

विरार : विवा महाविद्यालयात (Viva College) आर्ट इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन या विभागाच्या पुढाकाराने नुकतेच विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारतीच्या प्रांगणात “वी -बाजार ” भरवण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना “मार्केटिंग मिक्स” हा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी मार्केटिंग, संशोधन, जाहिराती, किंमती धोरण, सादरीकरण, बाजार भाव यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थ्यांना कळाव्यात या अनुषंगाने हा बाजार भरवण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये 86 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये पारंपारिक विषयांसोबतच प्रात्यक्षिकांवर देखील भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आखलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. याचेच भान राखून विवा महाविद्यालय देखील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असते. या उपक्रमाला महाविद्यालयाचे खजिनदार शिखर हितेंद्र ठाकूर, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उपक्रम प्रथम वर्ष मार्केटिंग मिक्स या विषयाचे सहा. प्राध्यापक मोहसीन शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

एखाद्या उत्पादनाची निर्मिती करत असताना त्याचे संशोधन करून लक्षित ग्राहक वर्ग ठरवून त्यांच्यापर्यंत ते उत्पादन पोहोचणे महत्त्वाचे ठरते. उत्पादनाच्या निर्मितीपासून ते उत्पादनाच्या जीवन चक्राबद्दल अनेक महत्त्वाच्या बाबी मार्केटिंग मिक्स या विषयांमध्ये शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना वर्गात शिकविले जाणारे धडे आणि त्याच्या प्रत्यक्ष जीवनात कशाप्रकारे उपयोग करायचा, याबद्दलचे ज्ञानदेखील या विषयांतर्गत दिले जाते म्हणूनच विद्यार्थ्यांना भविष्यात उत्पादन चक्र, उत्पादन वाढीसाठी करावे लागणारे प्रयत्न, सेल प्रमोशन, संशोधन इत्यादी बाबी समजाव्यात या अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोदक, पाणीपुरी, केक, बर्गर, फ्रँकी, कॉटन कॅन्डी, पावभाजी , जॉली चहा अशा विविध उत्पादनाचे स्टॉल लावले होते. या स्टॉल वरील सारे उत्पादने विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले अन् त्यांची विक्री देखील त्यांनी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजकता व व्यावसायिकता कौशल्ये निर्माण व्हावी हा हेतू मनात बाळगून वी – बाजारची मांडणी करण्यात आली होती. या वी बाजाराला महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या उपक्रमाला महाविद्यालयाचे ट्रस्ट अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, प्राचार्य डॉ.वी.श.अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, बीएएमएमसी विभाग प्रमुख शाहीन महीडा , सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.