दिल्ली – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (१३ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला ‘स्वतःच्या पायावर उभे राहण्यास’ आणि निवडणूक प्रचारात शरद पवारांची प्रतिमा आणि व्हिडिओ वापरण्यापासून दूर राहण्यास सांगितले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये अजित पवार छावणीला घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करत असताना ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाने वापरलेली प्रचार सामग्रीही सादर केली ज्यात शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले गेले. अजित पवार गट शरद पवारांच्या प्रतिमेचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला.
सिंघवी यांनी असेही सांगितले की अजित पवार गटाचे उमेदवार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात शरद पवार दिसत आहेत.
अजित पवार गटाचे प्रतिनिधीत्व करणारे वकील बलबीर सिंग यांनी प्रतिमा आणि व्हिडीओ हे चुकीचे असल्याचा आरोप केला असता सिंघवी म्हणाले की ही पोस्ट अमोल मिटकरी यांच्या अधिकृत X खात्यातून केली गेली होती.
सिंघवी यांनी अजित पवार गटातील अशा कारवाया म्हणजे शरद पवार यांच्याशी खोटेपणा दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा मुद्दा मांडताच न्यायमूर्तींनी काही दिवसांवरच निवडणुक असल्याने या मुद्दयास महत्त्व प्राप्त होत असल्याची टिप्पणी केली.
“जुना व्हिडीओ असो वा नसो, शरद पवार यांच्यासोबत तुमचे वैचारिक मतभेद आहेत आणि तुम्ही त्यांच्या विरोधात लढत आहात. मग तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा.” न्यायमूर्ती कांत म्हणाले.