अंधेरी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) के-पूर्व प्रभागातील (k east) महापालिका अधिकारी मंदार अशोक तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अंधेरी पूर्व (Andheri east) येथील जे. बी. नगरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई थांबवण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी अटक केली. लाचेचा पहिला हप्ता म्हणून तारीच्या वतीने ₹75 लाख स्वीकारल्याबद्दल एसीबीने 7 ऑगस्टला दोन व्यक्तींना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे.बी. नगरमधील शहीद भगतसिंग कॉलनीमध्ये तक्रारदार यांची दोन मजली इमारत आहे. 31 जुलै रोजी त्यांनी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तारी यांनी इमारतीचा दुसरा मजला आणि बेकायदेशीररीत्या जोडण्यात आलेले टेरेसवरील शेड तसेच बेकायदेशीरपणे बदललेले दोन फ्लॅट न पाडण्यासाठी ₹ 2 कोटींची लाच मागितल्याचा तक्रारदाराने दावा केला होता. .
6 ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी होत असताना, तारीने तक्रारदाराला लाचेचा पहिला हप्ता मागितला, ज्याची किंमत ₹75 लाख निश्चित करण्यात आली होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
हे पैसे रिअल इस्टेट एजंट मोहम्मद शेहजादा मोहम्मद यासीन शाह (33) आणि महापालिका कंत्राटदार प्रतीक विजय पिसे, (35) यांनी गोळा करायचे होते. तारीच्या वतीने पैसे घेण्यासाठी जेव्हा ते आले तेव्हा आम्ही सापळा रचून त्यांना पकडले. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचे हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 (कायदेशीर मोबदला व्यतिरिक्त सार्वजनिक सेवक) आणि 7-अ (भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी अनुचित फायदा घेणे) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकपूर्व जामिनासाठी तरी यांनी उच्च न्यायालयात (Bombay HC)अर्ज केला होता. तो रद्द झाल्यामुळे एसीबीने गुरुवारी तरी यांना अटक केली.