मुंबई : आज जो लढा आपण सुरू केला आहे, तो आपण जेव्हा वस्ती-वस्तीत, घरा-घरात जाऊ तेव्हा एक जागरूकता आपण निर्माण करायची आहे. या पुढे चळवळ असो की कोणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावे लागेल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर(Adv. Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. ते बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकाजवळील अमित शहा(Amit Shah) यांच्या विरोधातील निषेध मोर्चात बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अमित शहाला वाचवायला नरेंद्र मोदी(Narendra Modi) धावून आले. आपल्याला माहीत असेल की, या मुंबईत एक रंगा बिल्ला नावाची जोडी होती आणि आताचे हे रंगा बिल्ला एकमेकांना वाचवत आहेत.
मी नरेंद्र मोदी यांना सांगतो की, काँग्रेसला(Congress) जेवढ्या शिव्या द्यायच्या आहेत तेवढ्या द्या. आम्हाला काय फरक पडत नाही. पण, त्याच्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होईल का ? तर अजिबात नाही. तुमचं चारित्र्य आधीच डागाळलेलं आहे.
काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजप सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी तुम्हाला विचारतो की, या मध्य मुंबई मधील 1952 च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस(RSS) आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ? हे सांगा. या दोघांनी मिळून मध्य मुंबईमध्ये बाबासाहेबांना निवडणुकीत हरवले आहे, हा इतिहास असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, काँग्रेसने बाबासाहेबांना विरोध केला होता का? तर हो केला आहे. पण, तुमच्या आरएसएसने केलाय की नाही? हे सांगा असा सवाल उपस्थित करत आंबेडकर यांनी म्हटले की, ज्यावेळी संसदेत महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा झाली. त्यावेळी नरेंद्र मोदी तुम्ही ज्या आरएसएसचे स्वयंसेवक आहात, त्यातील महिला स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चा काढला होता की नाही, ते सांगा.
या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, सदस्य महेश भारतीय, मुंबई महासचिव आनंद जाधव, चेतन अहिरे तसेच शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह हजारो संविधान प्रेमी आणि फुले – शाहू – आंबेडकरवादी जनता उपस्थित होती.