विरार : विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात(Viva College) आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५, झोन ६, जिल्हा पालघर (Palghar) व विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) यांच्या सहकार्याने एकदिवसीय संशोधन अधिवेशन आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी जीवन जगत असताना विद्यापीठ व राज्य पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता आविष्कार तसेच विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन मुंबई विद्यापीठाद्वारे केले जाते. दिवसेंदिवस नवीन संशोधन निर्माण होऊन राष्ट्र निर्मितीचे कार्य व्हावे याकरिता राज्य व केंद्र सरकारकडून देखील मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते.
या अधिवेशनात प्रवेशिका सहा श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या. मानवता, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि फार्मसी. विवा महाविद्यालयातील दोन विद्यार्थी कृषी आणि पशुसंवर्धन, औषध आणि फार्मसी या श्रेणीं करिता पुढील फेरीसाठी निवडले गेले.
या अधिवेशनासाठी मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विकास विभाग डायरेक्टर डॉ. सुनील पाटील, डॉ. मीनाक्षी गुरव ( ओएसडी, अविष्कार संशोधन अधिवेशन, मुंबई विद्यापीठ), डॉ.मनीष देशमुख ( सह समन्वयक, आविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा ), प्राचार्य डॉ. वी. श. अडिगल उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे (विवा महाविद्यालय), उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा ( समन्वयक, अविष्कार संशोधन अधिवेशन पालघर जिल्हा ) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन संस्था वाणिज्य, कला व विज्ञान शाखेतील एकूण १२० विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असून २५९ पेक्षा जास्त प्राध्यापक – विद्यार्थी वर्गाने या अधिवेशनाचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.
या विभागीय संशोधन अधिवेशनाला मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अधिवेशनाचे नियोजन व आभारप्रदर्शन आविष्कार संशोधन अधिवेशनाचे स्थानिक समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांनी केले.