अंधेरी – खार स्थित 57 वर्षीय व्यावसायिकाला वांद्रे पोलिसांनी शनिवारी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 11वा रोड, खार पश्चिम येथील रहिवासी आहे, तर 16 वर्षीय पीडित मुलगा अंधेरी पूर्व येथे राहतो. वांद्रे पश्चिम येथील अल्मेडा पार्कजवळ शुक्रवारी ही घटना घडली.
30 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास, आरोपीने किशोरवयीन मुलाजवळ जाऊन त्याला विचारले की, ”तू अभिनय करू शकतोस का.” त्यानंतर उंची मोजण्याच्या बहाण्याने त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या मुलाने थेट वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासानंतर शनिवारी रात्री उशिरा आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.