MY ANDHERI NEWS

Your friendly community news portal

MY ANDHERI NEWS

MY ANDHERI NEWS

NEWS

‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ काव्यसंग्रह आणि ‘मयूरस्पर्श ‘ चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

पनवेल- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी सचिन बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाचे आणि निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श’ चारोळी संग्रहाचे अभियंता भवन, नवीन पनवेल येथे शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार, कवयित्री, शिक्षिका मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सब ऑर्डीनेट इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

कवयित्री अश्विनी बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ काव्य संग्रहाचे दुर्गेश सोनार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत. हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात, इतक्या त्या कविता विचार करायला लावणाऱ्या आहेत.”

“मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श”, अशा शब्दांत कवयित्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूर पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श ‘ विषयी आपले मनोगत व्यक्त केले. जेष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गझलकार ए. के . शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. साहित्यसंपदा प्रकाशनने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.

पल्लवी काळे यांनी अश्विनी बोलके यांच्या काव्यसंग्रहातील ‘ऋणानुबंध’ या कवितेचे वाचन केले. शब्दशिल्प कलाविष्कार संघच्या प्रमुख हिरकणी गीतांजली वाणी यांनी “दोन्ही पुस्तकांच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित होवोत” अशा शुभेच्छा दिल्या. ”मयूर पालकर हे आधुनिक युगातील परिपक्व कवी आहेत, भविष्यात त्यांच्या साहित्यिक संपदेची खास आवड असणारे वाचक असतील” अशा शब्दांत त्यांनी मयूर पालकरांचे कौतुक केले.

शुभंकरोती साहित्यिक संस्था संस्थापक कवयित्री सोनाली जगताप यांनी दोन्ही पुस्तके आवर्जून वाचण्यासारखी आहेत असे म्हटले. कवयित्री प्रियांका कोठावदे, रजनी येवले यांनी मयूरस्पर्श मधील काही चारोळ्यांचे वाचन केले. याप्रसंगी साहित्य संपदा संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षिकांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर यांनी केले. सचिन बोलके यांनी आभार व्यक्त केले.